
बालभारतीच्या इयत्ता ६वी इतिहासाच्या पुस्तकात फेरबदल करण्यात आले आहेत. जुन्या पुस्तकात वैदिक काळातील लोक मांसाहार करत होते, असा उल्लेख होता. मात्र, नव्या पुस्तकात हा उल्लेख हटवून त्यावेळचे लोक केवळ ‘वनस्पती-आधारित’ आहार घेत होते, असा उल्लेख करण्यात आला आहे. जुन्या पुस्तकातील संदर्भ बदलून इतिहास वस्तुस्थितीऐवजी ‘धार्मिक दृष्टिकोनातून’ मांडला जात असल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतला आहे.
बालभारतीने केलेल्या बदलांमुळे जुन्या आणि नवीन पुस्तकातील मांडणीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. आहारपद्धतीबाबत बालभारतीच्या सहावीच्या जुन्या पुस्तकात वैदिक काळातील लोक अन्नात भाज्यांसोबतच मांसाहाराचाही वापर करत असल्याचा स्पष्ट उल्लेख होता, तर नवीन पुस्तकात मात्र, वैदिक काळातील लोकांच्या आहारात केवळ धान्य, दूध, दही, तूप, मध आणि भाज्यांचा समावेश होता. त्यांचा आहार पूर्णपणे ‘वनस्पती-आधारित’ होता, असा दावा करण्यात आला आहे.
‘जातीव्यवस्थेबाबत बालभारतीच्या सहावीच्या जुन्या पुस्तकात ‘ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण सुरुवातीला व्यवसायावर आधारित होते, पण नंतर ते जन्मावरून ठरवले जाऊ लागले. यातूनच जाती निर्माण झाल्या आणि समाजात असमानता आली,’ असे स्पष्ट लिहिले होते. मात्र, नवीन पुस्तकात ‘नव्या रचनेतून ‘जातींमुळे समाजात असमानता आली’ हा संदर्भच पूर्णपणे वगळला असून, त्याऐवजी, ‘लोक सहकार्य आणि आपुलकीने राहत होते आणि प्रत्येकाची समाजात विशिष्ट जबाबदारी होती,’ अशी मांडणी करण्यात आली आहे.’
संस्कृतचे अभ्यासक प्रा. श्रीकांत बहुलकर यांच्या ‘बिब्लियोग्राफी ऑफ डायटेटिक्स इन एन्शंट अँड मिडियाव्हल इंडिया’ या ग्रंथाचा हवाला देत वैदिक वाङ्मयात पाहुण्यांसाठी बैल किंवा बोकड शिजवण्याची पद्धत होती, तसेच घोडे, गाई, शेळ्या आणि म्हशींचे मांस वापरले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनीही वैदिक विधींमध्ये आणि रोजच्या व्यवहारात मांसाहाराचे स्पष्ट उल्लेख केले आहे.
या वादावर ‘बालभारती’च्या इतिहास समितीच्या अध्यक्ष आणि पुरातत्व शास्त्रज्ञ शुभांगना अत्रे यांनी नवीन बदलांचे समर्थन केले आहे. वैदिक काळात मांसाहार होता हे मान्य करतानाच त्या म्हणाल्या, शेतीचा शोध लागल्यानंतर वनस्पती-आधारित अन्न हा लोकांच्या आहाराचा मुख्य भाग बनला होता. जुन्या ग्रंथांमधील उल्लेख आहारापेक्षा संस्कृतीच्या प्रगतीबद्दल अधिक होते, म्हणूनच लेखकांनी नवीन पुस्तकात त्याचा अंतर्भाव केला नसावा.
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक म्हणाल्या, पाठ्यपुस्तकातील या मुद्द्यांवर आम्ही पाठ्यपुस्तकनिर्मिती समितीशी सविस्तर चर्चा करू आणि गरजेनुसार पुढील आवृत्त्यांमध्ये योग्य ते बदल केले जातील.






























































