नऊ कामगारांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? मोशी कचरा डेपो दुर्घटना : अंतिम अहवाल कधी सादर होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मोशी येथील कचरा डेपोतील सुमारे सात मजली कचऱ्याचा डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा बळी गेलेल्या घटनेला सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने घटनेचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र, नऊ कामगारांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण याचा अंतिम अहवाल कधी सादर होणार हा प्रश्नच आहे.
प्रशासनाकडून केवळ आर्थिक मदतीची घोषणा केली. दुर्घटनेला जबाबदार मुख्य दोषींना अभय देऊन वाचवलेल्या दोन कामगारांवर गुन्हा दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवले. ही घटना का झाली, इमारतीला परवानगी कोणी दिली, या प्रकल्पात छुपे पार्टनर कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. नऊ कुटुंबे उघड्यावर पडली. त्यानंतर पतीच्या मृत्यूच्या विरहात एका विवाहितेने आत्महत्या केली. पैसा हा न्याय होऊ शकत नाही. या कंपनीचा मालक, स्लीपिंग पार्टनर यांची माहिती प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. एकाच मजल्याची परवानगी असताना तीन मजली इमारत कशी बांधली, बांधकाम परवानगीसाठी कोणी दबाव टाकत होते? याची चौकशी व्हायला हवी. दुर्घटनेतील एकाही दोषीला सोडणार नाही, असे आश्वासन अनेक मंत्र्यांनी दिले होते. मात्र, दोन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यापलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांकडून तपास सुरूच

कचरा डेपो दुर्घटनेचा तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत. ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९), सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) या दोघांवर नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध तसेच, १२ कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील अशोककुमार गुप्ता याला अटक करण्यात आली आहे, तर सपकाळ यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. या दोन कामगारांव्यतिरिक्त या घटनेला कोण कोण जबाबदार आहे, याचा तपास सुरू असल्याचे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी सांगितले.