
चीनमध्ये टेस्लासह अनेक वाहन कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे 40 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या (रीकॉल केली) आहेत. यामध्ये टेस्लाच्या सुमारे 29 लाख गाड्यांचा समावेश आहे. चीनमध्ये तयार झालेल्या आणि इतर देशांतून आयात केलेल्या Model 3, Model Y, Model X आणि Model S या गाड्यांचा यात समावेश आहे. या गाड्यांच्या दरवाजांच्या हँडलमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या असल्याचे चीनच्या बाजार नियामकाने सांगितले आहे.
टेस्लासह अनेक इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये दरवाजे उघडण्यासाठी लपवलेले किंवा बाहेरून फारसे न दिसणारे हँडल वापरले जातात. मात्र वाहन अपघातानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यास अशा लपवलेल्या इलेक्ट्रॉनिक दरवाजांमुळे प्रवाशांना आत अडकून पडण्याचा धोका निर्माण होतो. आपत्कालीन परिस्थितीत गाडीतील लोकांना बाहेर पडणे कठीण होऊ शकते. तसेच बाहेरून बचाव करणाऱ्या व्यक्तींनाही गाडीचा दरवाजा उघडता येणार नाही, अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या समस्येमुळे चीनने लपवलेल्या डोअर हँडल्सबाबत कडक पावले उचलली आहेत. फेब्रुवारीमध्ये चीनने 2027 पासून अशा प्रकारच्या हँडल्सवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. चीन आणि इतर देशांमध्ये झालेल्या काही इलेक्ट्रिक वाहनांच्या अपघातांमध्ये दरवाजे न उघडल्याने लोक गाडीत अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वाहनांच्या डिझाइनपेक्षा प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टेस्ला या समस्येचा धोका कमी करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे. या रिकॉलमध्ये इतर चिनी कंपन्यांचाही समावेश आहे. Xiaomi ३.९ लाखांहून अधिक गाड्या, तर Leapmotor ३.७ लाखांहून अधिक गाड्या परत मागवणार आहे. Geely आणि XPENG या कंपन्यांनीही काही गाड्यांचा रिकॉल जाहीर केला आहे. या कंपन्यांच्या गाड्यांमध्येही दरवाजांच्या हँडलशी संबंधित समस्या असल्याचे सांगण्यात आले आहे.




























































