
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘दिमागी नक्षल’ या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी मोदींवर जोरदार टीका केली. सरकारने जनतेशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला देताना बेरोजगारी, महागाई आणि देशातील गुंतवणुकीबाबत सरकारने काय केले, यावर बोलावे, असे खर्गे म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना खर्गे म्हणाले, “पंतप्रधान मोदी ‘दिमागी नक्षल’ हा नवा शब्द वापरत आहेत. त्यामुळे आपण सगळेच ‘दिमागी नक्षल’ आहोत. देशासाठी तुम्ही काय करत आहात, याबद्दल बोला. रोजगार, महागाई, गुंतवणूक आणि देशातील लोकांच्या हाताला काम देण्याबाबत बोला. तसेच “आम्ही देशद्रोही आहोत का? आम्ही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो. दुसरीकडे तुम्ही ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली, त्यांना माफीनामे लिहून दिले आणि आज स्वतःला देशभक्त म्हणता. तुम्हाला लाज वाटत नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा वापर करून सरकारने जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करू नये, असा खर्गे यांच्या वक्तव्याचा सूर होता. बेरोजगारी, महागाई, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
























































