
पुण्यातील आंबेगावात शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात आले होते. कुकरमध्ये 13 शिट्या देऊनही वाटाणा शिजत नव्हता. तेव्हा एका शिक्षिकेने व्हिडीओ बनवून याबाबत तक्रार केली होती. त्यावर हा वाटाणा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाऊ घालावा असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रो की गुंज कार्यक्रमाला फडणवीस पेड इव्हेंट म्हणाले होते. त्यावर भारतीय जनता पक्षच पेड इव्हेंट आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजे. कारण या लोकांमुळे सरकारला कळालं की जेन झीचे काही प्रश्न आहेत. नीटचे पेपर फुटले सरकार लक्ष घालत नव्हते. काल जेन झीचा एक मेळावा छात्रों की गुंज पुण्यात झाला. फडणवीस म्हणाले की हा पेड इव्हेंट आहे. आज नागपुरात फडणवीस यांचा जेन झी सोबत इव्हेंट आहे मग हा इव्हेंट पेड आहे का? पेड इव्हेंट म्हणून तुम्ही तरुणांचा, विद्यार्थांचा अपमान करत आहात. मग लाडकी बहीण काय होता? लाडकी बहीण योजनेतून तुम्ही 1500 रुपये देऊन तुम्ही पेड इव्हेंटच केला होता. बिहारमध्ये मोदींनी दहा हजार रुपये दिले, तो ही पेड इव्हेंट होता. भारतीय जनता पक्ष हाच एक पेड इव्हेंट आहे, असे संजय राऊत म्हणाले.
एक अत्यंत गंभीर असा प्रश्न या महाराष्ट्रात आहे. त्यावर आपले मुख्यमंत्री काही बोलले का? शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. आंबेगावमध्ये एका शाळेत कच्चा वाटाणा आणि इतर धान्य कुकरच्या 13 शिट्या देऊन शिजत नाही, हे लोकांच्या समोर आणणाऱ्या शिक्षिका रेश्मा पाध्ये यांना निलिंबित केले. देवेंद्रजींनी हा वाटाणा तुमच्या घरी जाऊन शिजवा. एका बाजूला पंतप्रधान त्यांच्या लोकांना सागंतात की इन्स्टा रील्स बनवा. ज्यांनी अंगणवाडीला हे धान्य पुरवले ते पुरवठादार नागपूरचे आहेत. नागपूरला जे जेन झी येणार आहेत. हे जेन झी पेड नसतील तर एखाद्या विद्यार्थ्याने शालेय पोषण आहारात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याबाबत प्रश्न विचारावा. शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या माणसाचे नाव पगारिया आहे. हा माणूस देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस असून निवडणुकीत हा भाजपला पैसे पुरवतो. यावर देवेंद्र फडणवीस बोलले तर ते या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभतील. पण यावर बोललं की निलंबीत करणार, गुन्हे दाखल करणार. हा वाटणा घेऊन विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर जावं आणि मुख्यमंत्र्यांना खाऊ घालावा. या प्रकरणी पगारियाचं निलंबन झालं पाहिजे. यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना झोप लागत नाहिये. राहुल गांधी यांनी सभा घेतल्यानंतर भाजपने मेळावे घेतले, यापूर्वी त्यांना आठवण नव्हती? आदित्य ठाकरे यांनी मैदानं वाचवण्यासाठी जेन झी सोबत आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना आठवण झाली. मंत्री विद्यापीठात जातात. जीतन राम मांझी सारखे नेते एखाद्या विद्यापीठात गेले. ज्यांना शिक्षणातलं ओ का ठो कळत नाही, असे अर्धे मंत्री तुमच्याकडे आहेत. महाराष्ट्रात हा जेन झी चा अपमान आहे. असे अनेक मंत्री आहेत की ज्यांनी शिक्षणाचा आईचा घो करून टाकला. तेव्हा कृपा करून फडणवीसांनी जेन झी च्या आणि शिक्षकांचा नादी लागू नये. आतापर्यंत तुम्ही जे शोषण केले आहे, ते आता सगळं बाहेर येऊ लागले आहे. तुम्हाला तो कच्चा वाटाणा खायला घालू, तुम्हाला तो खावाच लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी हा कच्चा वाटाणा खाल्ला आणि आजारी पडले त्यांची माफी मागा. शिळं अन्न खाल्याने अनेक मुलं आजारी पडली, त्यांना विषबाधा झाली. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
MIDC मध्ये मराठी उद्योजकांना प्लॉट मिळत नाहीत. अशी माझ्याकडे 11 प्रकरणं आली आहेत. डायरेक्ट एजंटला भेटायला लावतात. MIDC प्लॉट कुणाला जातात, गुंठ्यामागे किती पैसे घेतले जातात, कुंभमेळ्यात कशा प्रकारे पैसे खाल्ले जातात. धर्म, उद्योग शिक्षण, मुलांचा पोषण आहार सोडला नाही. सर्व ठिकाणी पैश्यांचा अपहार सुरू आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतली मैदानं वाचवण्यासाठी उत्तम प्रकारे आंदोलन हाती घेतले आहे. ही सगळी मैदानं एका फडणवीसांच्या मर्जीतली विशिष्ट बिल्डरांच्या हाती दिली जात आहेत. मुंबई ही विकली आहे, हे बिल्डर फडणवीसांचे हस्तक आहेत आणि उर्वरित उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हस्तक आहेत. सगळ्यांनी मिळून मुंबई लिलावात काढली आहे. काल मी पश्चिम महाराष्ट्रात होतो, तिथेही अदानीने जमीन ताब्यात घेतली आहे. तिथे 27 गावचे शेतकरी माळशेज घाटावरच्या खाली रस्त्यावर उतरत आहेत. चाकणची MIDC जबरदस्तीने विमानतळासाठी, अदानीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. मी काल त्या भागात होतो आणि असंख्य शेतकरी मला भेटले, हे आंदोलन परत उभं राहतंय, असेही संजय राऊत म्हणाले.
साखर महागल्या प्रकरणी संजय राऊत म्हणाले की गेल्या 12 वर्षांत मरण स्वस्त झालं आहे. साखर बनवण्यासाठी लागणारा ऊस इथेनॉलमध्ये जातो. सरकारला माहित असायला हवं. जे भाजपचे नेते जेन झी चे मेळावे घेत आहेत. त्यांनी त्या मुलांच्या घरी जावं आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधावा, असेही संजय राऊत म्हणाले.
























































