
संरक्षण मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या गरोदर महिलेचा दिल्लीतील द्वारका भागात तिच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाझिया खानम (वय – 30) असे मृत महिलेचे नाव असून पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
नाझिया खानमचा विवाह 11 एप्रिल 2026 रोजी अजम अली खान याच्याशी झाला होता. नाझियाचे वडील तोवाब खान यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच तिचा पती अजम अली खान, सासू सामीन निशा, सासरे बाबर अली खान आणि इतर नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला सतत शिवीगाळ करणे, मारहाण करणे, घरातून हाकलून देणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मृत्यूच्या वेळी नाझिया तीन महिन्यांची गरोदर होती. तिने वारंवार फोन करून सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिच्या कुटुंबाला दिली होती. 21 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 4 वाजता नाझियाने आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. मात्र, सासरच्या मंडळींनीच तिची हत्या करून हा आत्महत्येचा बनाव रचल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषींवर एफआयआर दाखल करून शवविच्छेदन आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सतपाल डागर हे द्वारका येथील नाझियाच्या घरी पोहोचले. पत्नीशी वाद झाल्यानंतर मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. काही वेळाने बाहेर आलो असता ती खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती नाझियाच्या पतीने दिली. यानंतर पोलिसांनी द्वारका येथील गुन्हे अन्वेषण पथकाला पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली व पुरावे गोळा केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेमुळे 21 ऑगस्ट रोजी शवविच्छेदन होऊ शकले नव्हते. त्यानंतर नाझियाचे वडील तोवाब खान आणि तिच्या भावाने बिजवासन येथील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आपले अधिकृत जबाब नोंदवले. या जबाबात वडिलांनी नाझियाच्या मृत्यूला पती आणि सासरचे लोकच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 आणि कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
























































