
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथेल कॅटरहॅम यांनी नुकताच आपला 117 वा वाढदिवस साजरा केला आहे. ब्रिटनमधील सरे येथील हॉलमार्क लेकव्ह्यू केअर होममध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एप्रिल 2025 मध्ये ब्राझीलच्या 116 वर्षीय नन सिस्टर इना कॅनाबारो लुकास यांच्या निधनानंतर इथेल कॅटरहॅम या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे मानवी इतिहासातील एका सुवर्णकाळाची साक्ष मानला जात आहे.
इथेल यांचा जन्म 1909 मध्ये हॅम्पशायर येथील शिपटन बेलिंगर येथे झाला. टायटॅनिक जहाज बुडण्याच्या 3 वर्षे आधी आणि रशियन क्रांतीच्या ८ वर्षे आधी त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटनचे राजे एडवर्ड सातवे यांच्या कार्यकाळात जन्मलेल्या त्या शेवटच्या हयात व्यक्ती आहेत.
वयाच्या अठराव्या वर्षी त्या एका लष्करी कुटुंबासाठी ‘ऑ पेअर’ (कुटुंब आणि लहान मुलांची काळजी घेणारी व्यक्ती) म्हणून काम करण्यासाठी हिंदुस्थानात आल्या होत्या. 1931 मध्ये ब्रिटिश सैन्यातील लेफ्टनंट कर्नल नॉर्मन यांच्याशी त्यांची भेट झाली आणि पुढे विवाह झाला. या दांपत्याने हाँगकाँगमध्ये राहताना एका नर्सरी स्कूलची स्थापना केली.
इथेल कॅटरहॅम यांना आठ भावंडे होती आणि त्यांचा नंबर दुसरा होता. त्यांची बहीण ग्लॅडिस बाबिलास या देखील 104 वर्षांपर्यंत जगल्या होत्या. इथेल यांचे पती नॉर्मन यांचे 1976 मध्ये निधन झाले. त्यांच्या दोन मुलींचेही निधन झाले असून, सध्या त्यांना 3 नाती आणि 5 पणतू आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 110 व्या वर्षी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’नुसार, कोविड-19 वर यशस्वी मात करणाऱ्या त्या सर्वात वृद्ध व्यक्तींपैकी एक आहेत.

इथेल कॅटरहॅम यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये दोन महायुद्धे, टायटॅनिकचा अपघात, रशियन क्रांती, कोविड-19 महामारी यासारख्या ऐतिहासिक घटना पाहिल्या. तसेच तंत्रज्ञानातील मोठे बदलही पाहिले. गेल्या वर्षी त्यांनी 116 वा वाढदिवस साजरा केल्यांनतर ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी त्यांची भेटही घेतली होती. यावेळी त्यांनी 1967 मधील चार्ल्स यांच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी चार्ल्स 21 वर्षांचे होते. त्या काळात सर्व मुली तुमच्या प्रेमात होत्या आणि त्यांना तुमच्याशी लग्न करायचे होते, असे कॅटरहॅम यांनी प्रिन्स चार्ल्स यांना सांगितले.

सर्वाधिक काळ जगलेले व्यक्ती
दरम्यान, मानवी इतिहासात सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम फ्रान्सच्या जीन काल्मेंट यांच्या नावावर आहे. ते 122 वर्षे 164 दिवस जगले. 1997 मध्ये त्यांचे निधन झाले.























































