पदोन्नती झाली, मात्र पगारवाढ झालीच नाही; सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Indeed च्या त्रैमासिक भरती ट्रॅकरनुसार, देशातील १० पैकी जवळपास ६ नोकरदार म्हणतात की त्यांचे पद आणि पगार यांच्यात थेट संबंध नाही. यावरून असे दिसून येते की, अनेक कार्यस्थळांवर पद किंवा व्यावसायिक ओळख आणि पगार यांमधील दरी वाढत आहे. सर्वेक्षण केलेल्या जवळपास ८०% नोकरदरांनी हे मान्य केले की, विविध उद्योगांमध्ये पदनामाचा अतिवापर सामान्य झाला आहे. अनेकांनी असे सांगितले की, त्यांच्या सहकाऱ्यांना पगारात वाढ न होता वरिष्ठ पदे मिळाले आहे. त्यामुळे पदोन्नती झाली पण पगारवाढ झाली नाही, असे चित्र असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येते.

अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत आपले पद बदललेल्या जवळपास एक-तृतीयांश नोकरदरांनी पगारात कोणतीही वाढ झाली नसल्याचे किंवा ५% पेक्षा कमी वाढ झाल्याचे सांगितले. दरम्यान, ५२% नोकरदरांनी सांगितले की, नवीन नोकरी निवडताना ते चांगल्या पदापेक्षा जास्त पगाराला प्राधान्य देतात. करिअरमधील प्रगतीसाठी पद महत्त्वाचे असले तरी, पगार हा करिअरमधील प्रगतीसाठी एक महत्त्वाचा निकष आहे.

कर्मचाऱ्यांसाठी पदे अजूनही महत्त्वाची आहेत, परंतु त्यांना त्यांच्या पदाशी संबंधित जबाबदाऱ्या आणि पगार योग्य असावा असे वाटते.जवळपास ७०% लोकांनी सांगितले की त्यांचे पद भविष्यातील करिअरच्या संधी ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अंदाजे ७३% लोकांचा असा विश्वास आहे की चांगले पद संभाव्य नियोक्त्यांच्या नजरेत त्यांची प्रतिमा उंचावते. शिवाय, ५७% लोकांनी सांगितले की त्यांचे पद त्यांच्या एकूण नोकरीतील समाधानावर लक्षणीय परिणाम करते.

या सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की, कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उच्च पदांचा वापर वाढत्या प्रमाणात करत आहेत. जवळपास ५७% नियोक्त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पदे देतात.

नियोक्त्यांच्या मते, बदलत्या बाजारपेठेच्या गरजा आणि विकसित होत असलेली कॉर्पोरेट रचना ही या प्रवृत्तीमागील मुख्य कारणे आहेत. काही कंपन्या, पगारासाठी कमी बजेट असूनही, कर्मचाऱ्यांच्या प्रगतीची दखल घेण्यासाठी आणि चांगल्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांना उच्च पदे देतात.