
डार्विन कसोटीतील पराभवाने पेटून उठलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दुसऱया कसोटीत केवळ दोनच दिवसांत खेळ खल्लास करीत व्याजासकट मॅके कसोटीत बदला घेतला. मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एक डाव आणि 51 धावांनी धुव्वा उडवत दोन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. स्टार्कने कसोटीत 51 धावांत 10 विकेट घेत बांगलादेशची दाणादाण उडविली. तोच या कसोटीचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळही त्याच्याच गळय़ात पडली.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळली गेलेली ही दुसऱया क्रमांकाची सर्वात कमी कालावधीत संपलेली कसोटी ठरली. बांगलादेशचा पहिल्या डावात अवघ्या 64 धावांत खुर्दा उडाल्यानंतर त्यांचा दुसरा डावही 38.3 षटकांत 95 धावांतच गारद झाला. कसोटीच्या दोन्ही डावांत शंभरच्या आत बाद होण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 210 धावा केल्या. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात 146 धावांची भक्कम आघाडी मिळाली. बांगलादेशला ही आघाडी भरून काढणे तर दूरच, पण ऑस्ट्रेलियाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरजदेखील पडली नाही.
स्टार्कचा ‘दस’ का दम
मिचेल स्टार्कने दुसऱया डावातही सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या फलंदाजांवर दहशत निर्माण केली. शादमन इस्लामला (1) लाबुशेनकरवी झेलबाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोमिनुल हकचा (0) त्रिफळा उडवला. त्यानंतर तन्झीद हसनला (9) कमिन्सने बाद केले. नजमुल हुसेन शांतोने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्टार्कच्या गोलंदाजीवर पाच चौकार ठोकले, मात्र 31 धावांवर तो लियॉनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लिटन दास पुन्हा एकदा भोपळाही न पह्डता माघारी परतला. या मालिकेत त्याला एकही धाव करता आली नाही. स्टार्कने तैजुल इस्लामला (7) बाद करत सामन्यातील आपला दहावा बळी मिळवला.
लायनने दिला शेवटचा धक्का
चहापानानंतर बांगलादेशचा डाव केवळ तीन चेंडूंत संपला. नॅथन लायनने टस्किन अहमदला (8) स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. त्यानंतर शोरिफुल इस्लामला (0) लायनने झेलबाद करत बांगलादेशचा डाव संपवला. शोरिफुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 धावांत सात विकेट घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली. मात्र, स्टार्कच्या वादळासमोर त्याची कामगिरी झाकोळली गेली.





























































