आमदाराच्या पीएचा मोबाईल लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ताधारी पक्षातील एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा मोबाईल चोरटय़ाने लांबवल्याची घटना घडली. बसमध्ये चढताना चोरटय़ाने धक्का मारून पह्न चोरला. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे सत्ताधारी पक्षातील एका पुण्यातील स्थानिक आमदाराचे स्वीय सहाय्यक आहेत. गेल्या आठवडय़ात ते उपचारासाठी एका क्लिनिकमध्ये आले. उपचारानंतर ते मंत्रालयात जाण्यासाठी निघाले. मंत्रालयात जाण्यासाठी त्यांनी 88 क्रमांकाची बेस्टची बस पकडली. बसमध्ये चढत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने धक्का दिला. त्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल चोरून पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका सहप्रवाशाकडून त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा चोरटय़ाने त्यांचा मोबाईल आपल्याकडे असून बस स्टॉपवर येऊन घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार हे बसमधून उतरून ते बस स्टॉपवर गेले. तिथे त्यांना कोणीही दिसले नाही. गावदेवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.