
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीसाठी वापरली जाणारी ‘एमएच-12’ ही मालिका अखेरच्या टप्प्यात आली असून तिच्यातील उपलब्ध क्रमांक येत्या दोन ते तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये, यासाठी ‘एमएच-61’ ही स्वतंत्र नोंदणी मालिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. त्यामुळे पुण्यातील वाहनांवर आता एमएच 61 असे असणार आहे.
पुणे आरटीओमध्ये सध्या दुचाकाRसाठी ‘एमएच-12-झेडझेड’ ही दोन अक्षरी मालिका सुरू आहे. या मालिकेतील उपलब्ध नंबर जवळपास संपले आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि त्यानुसार नोंदणी क्रमांकांची वाढती मागणी लक्षात घेता पुणे आरटीओने नवीन मालिका सुरू करण्यासाठी विविध पर्यायांचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविले होते. ‘एमएच-12’ ही मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही प्रयत्न केले होते. त्यासाठी ‘एमएच-12-एएए-1234’ अशा तीन अक्षरी मालिकेचा पर्याय पुढे आला होता. मात्र क्रमांकाची लांबी वाढल्याने सीसीटीव्ही तसेच स्वयंचलित नंबरप्लेट ओळख प्रणालीला क्रमांक टिपताना अडचणी येण्याची शक्यता असल्याने हा पर्याय मागे पडला. त्यानंतर ‘एमएच-12-1-ए’ या स्वरूपाचा पर्याय सुचविण्यात आला आहे.
…तांत्रिक बदलानंतर ‘एमएच-12-1-ए’
‘एमएच-12-1-ए’ ही मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे आरटीओकडून मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. ही मालिका उपलब्ध करून देण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक आहेत. ते बदल झाल्यास पुढील काही महिन्यांत ‘एमएच-12-1-ए’ ही मालिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ‘एमएच-61’ या मालिकेच्या माध्यमातून वाहन नोंदणी सुरू ठेवण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.






























































