वाहनांच्या पीयूसी शुल्काच्या दरामध्ये वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीच्या (पीयूसी) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरवाढीला मंजुरी देत परिवहन आयुक्त कार्यालयाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार दुचाकीसाठी 50 ऐवजी 60 रुपये, पेट्रोलवरील तिनचाकी वाहनांसाठी 100 ऐवजी 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी 125 ऐवजी 150 रुपये व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी 150 ऐवजी 180 रुपये पीयूसी शुल्क आकारले जाणार आहे.

महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी शुल्काच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली. समितीच्या शिफारसीनुसार सरकारला अहवाल सादर करण्यात आला होता. यादरम्यान उच्च न्यायालयाने चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्याला अनुसरून परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनांच्या पीयूसी दरामध्ये सुधारणा करून दरवाढीला मंजुरी दिली. प्रत्येक वायुप्रदूषण नियंत्रण केद्रावर सुधारित दराचे फलक दर्शनी भागात ठळकपणे लावावेत, विहीत दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.