अलिबाग शहरातील भुयारी गटार, पाणी योजनेची कामे निकृष्ट; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, शिवसेनेने उठवला आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग नगर परिषदेच्या हद्दीत ५८ कोटींची भुयारी गटार योजना आणि ४० कोटींची पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. मात्र या दोन्ही कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक व विरोधी पक्षनेते अॅड. संदीप जनार्दन पालकर यांनी केला आहे. यासंदर्भात पालकर यांनी आवाज उठवत रायगड जिल्हाधिकारी, नगरविकास संचालनालय आणि अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र पाठवले असून या कामांची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

शासनाने अलिबाग शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी दिला. शहरातील रस्ते खोदून कामे झाली. पण प्रत्यक्षात निकृष्ट कामामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. काही ठिकाणी कामे अर्धवट आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नियोजित वेळेत कामे पूर्ण व्हायला हवी होती मात्र ही कामे आजतागायत रखडली आहेत. ठेकेदार विलास जगताप यांना या कामाचा ठेका दिला असून कामावर देखरेख करणारे अधिकारी, अभियंते यांच्या भूमिकेवरही संदीप पालकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे पाणी योजना आणि भुयारी गटार योजनेची चौकशी करण्याची मागणी पालकर यांनी केली आहे.

चौकशी होईपर्यंत बिले थांबवा

कामाची बिले, अंदाजपत्रक, मोजमाप या सगळ्याची सखोल चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. तसेच चौकशी होईपर्यंत ठेकेदाराची बिले मंजूर करू नयेत, अशी मागणी पालकर यांनी शासनाकडे केली आहे. अलिबाग शहरातील विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला जात असून भुयारी गटार आणि पाणी योजनेच्या कामावर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे अलिबाग नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे.