‘अच्छे दिन’च्या नावाखाली महागाईचा भडका; सर्वसामान्यांनी घर कसं चालवायचं? काँग्रेसचा मोदी सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘अच्छे दिन’चा दावा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, या महागाईत सर्वसामान्यांनी घर कसे चालवायचे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

X वर एक पोस्ट करत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की, साखरेनंतर आता कांद्याचे भावही गगनाला भिडले आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत अवघ्या एका महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, अनेक राज्यांमध्ये घाऊक बाजारात दर दुप्पट झाले आहेत. दुसरीकडे सरकारचा बफर स्टॉक रिकामा पडल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. याशिवाय दूध, खाद्यतेल, फळे, रेशन, साबण, डाळी आणि मसाल्यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत.

एकीकडे रोजगाराच्या संधींचा अभाव आणि नोकऱ्यांवर असलेली गदा, तर दुसरीकडे सातत्याने वाढणारी महागाई यामुळे जनता दुहेरी संकटात सापडली आहे. उत्पन्न मर्यादित असताना दरमहा स्वयंपाकघराचा खर्च वाढत असल्याने लोकांच्या ताटातून पोषण गायब होत चालले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले असून, जनता या परिस्थितीची योग्य नोंद घेईल आणि सरकारला माफ करणार नाही, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.