
हिंदुस्थानातून परदेशात जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल होणार आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची अनिवार्य पद्धत बंद केली जाणार आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने हा निर्णय घेतला असून, देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ही नवी व्यवस्था लागू होणार आहे. या बदलामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल होण्याची अपेक्षा आहे.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नव्या व्यवस्थेनुसार, परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर मोबाईलमधील ई-बोर्डिंग पास दाखवता येणार आहे. त्यामुळे केवळ इमिग्रेशनचा शिक्का घेण्यासाठी बोर्डिंग पासची छापील प्रत जवळ बाळगण्याची गरज राहणार नाही. मात्र, ज्या प्रवाशांना प्रिंटेड बोर्डिंग पास सोबत ठेवायचा आहे, त्यांनाही तो वापरता येईल. फरक एवढाच की इमिग्रेशन अधिकारी त्या बोर्डिंग पासवर शिक्का मारणार नाहीत.
सध्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना इमिग्रेशन क्लीअरन्सच्या वेळी बोर्डिंग पास सादर करावा लागतो आणि त्यावर अधिकाऱ्याकडून शिक्का मारला जातो. या प्रक्रियेमुळे काही वेळा प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच चुकीचा किंवा अस्पष्ट शिक्का पडल्यामुळे बोर्डिंग पासवरील माहिती वाचण्यात अडचणी येत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर ब्युरो ऑफ इमिग्रेशनने ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली एफआरआरओकडून जारी करण्यात आलेल्या अंतर्गत संदेशाद्वारे विमानतळ ऑपरेटर, सीआयएसएफ आणि संबंधित यंत्रणांना या बदलाची माहिती देण्यात आली आहे. नव्या नियमामुळे देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पास स्टॅम्पिंगची अनिवार्यता संपुष्टात येणार आहे. नव्या व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा डिजिटल बोर्डिंग पास वापरणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. प्रवासी आपल्या स्मार्टफोनवरील ई-बोर्डिंग पास इमिग्रेशन काउंटरवर दाखवून क्लीअरन्सची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
तरीही प्रवाशांनी प्रवासादरम्यान फोन चार्ज असणे आणि बोर्डिंग पास ऑफलाइन उपलब्ध असणे याची काळजी घेणे फायदेशीर ठरेल. ज्यांना कागदी प्रत सोबत ठेवायची आहे, ते प्रिंटेड बोर्डिंग पासही बाळगू शकतात; मात्र त्यावर इमिग्रेशनचा शिक्का मारला जाणार नाही. या निर्णयाचा अर्थ पासपोर्टवरील इमिग्रेशन शिक्केही 1 सप्टेंबरपासून बंद होतील, असा नाही. सध्या निश्चित करण्यात आलेला बदल केवळ बोर्डिंग पासच्या स्टॅम्पिंगपुरता मर्यादित आहे.
बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची अतिरिक्त प्रक्रिया हटवल्यामुळे इमिग्रेशन क्लीअरन्स अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. कागदी कागदपत्रांवरील अवलंबित्व कमी करून विमानतळावरील प्रक्रिया डिजिटल करण्याच्या दिशेनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


























































