
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचे सावनेरचे आमदार आशीष देशमुख यांच्याशी संबंधित खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेला आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे-पाटील तर नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशन या संस्थेने आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्या शाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे 830 खाटांचे रुग्णालयदेखील आहे, तर नागपूर येथे व्ही.एस.पी.एम. अॅपॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नार्ंसग विद्या शाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू होणार. संस्थेकडे 1 हजार 138 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आहे.
या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार निरीक्षण समितीकडून पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली.
पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
नाशिक जिह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी एपूण 15 नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जत नगरपालिकेला प्रशासकीय इमारतीसाठी जमीन सांगली जिल्ह्यातील जत नगरपालिकेला प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत वाढ
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्ससह खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास याशिवाय रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख, रौप्यसाठी पाच लाख तर कांस्यसाठी तीन लाख अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे 10 लाख, 7 लाख, 5 लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रमे 7 लाख, 5 लाख, 3 लाख रुपये तर खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रमे 3 लाख, 2 लाख, 1 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी 22.50वरून 50 लाख, रौप्यसाठी 15वरून 30 लाख तर कांस्य पदासाठी 7.5वरून 20 अशी वाढ करण्यात आली आहे.































































