
‘राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ विजेते ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि एमटीएनएलचे निवृत्त कर्मचारी प्रमोद पवार यांना दादर येथे विशेष गौरव सोहळय़ात सन्मानित करण्यात आले. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, स्थानिय लोकाधिकार समिती आणि जाणीव न्यासाच्या संयुक्त विद्यमाने नायगाव टेलिफोन एक्स्चेंज येथे हा सोहळा पार पडला.
प्रमोद पवार यांना खासदार सावंत यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. याप्रसंगी महानगर टेलिपह्न निगम कामगार संघ आणि ऑफिसर असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री प्रकाश शिरवाडकर, दिलीप जाधव, संजय ढोलम, दिलीप साटम, प्रदीप परब, सूर्यकांत मुद्रस, महेश धुरी, रजनी वैती, स्मिता तेंडुलकर, कल्याणी सावंत, राजवटकर आदी मान्यवरांसह अनेक सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. समारंभात बोलताना खासदार सावंत यांनी प्रमोद पवार यांच्यासोबतचे जुने कौटुंबिक ऋणानुबंध व इतर जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर सत्काराला उत्तर देताना प्रमोद पवार यांनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी उलगडल्या. खासदार अरविंद सावंत यांच्या चाळीतील 10 बाय 10 फुटाच्या खोलीतील छोटय़ाशा पोटमाळय़ावर होणाऱया एकांकिकांच्या तालमींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कलावंतांनी केवळ बोलक्या बाहुल्या बनू नये – खासदार सावंत
रुपेरी पडद्यावर बंडखोर, सत्य आणि न्यायासाठी कणखर भूमिका साकार करणाऱया कलाकारांनी प्रत्यक्ष जीवनातही समाजातील चुकांवर उघडपणे व्यक्त व्हावे. देशात, समाजात जे काही सुरू आहे, त्यावर मूग गिळून बसणे योग्य वाटत नाही. कलाकारांनी केवळ बोलक्या बाहुल्या बनू नये, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केले.



























































