
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विरार पश्चिम येथील विराटनगरात शिवसेनेचा जोरदार आवाज घुमला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या शाखेचे उद्घाटन पालघर लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विलास पोतनीस आणि पालघर लोकसभा यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आवाज कोणाचा… शिवसेनेचा, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरते. त्यामुळे विराटनगरमधील ही शाखा सामान्य नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास विलास पोतनीस यांनी व्यक्त केला. विराटनगर शाखेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक गतिमान होईल, असे सांगतानाच ही पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक विभागात शिवसेनेची शाखा असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमोल कीर्तिकर यांनी केले.
विराटनगर येथील शिवसेना उपशहरप्रमुख राहुल फडतरे, विभागप्रमुख शरद सावंत, विभाग संघटक अनामिका जाधव, उपविभागप्रमुख राजेश गोळे, भूपेश बायदे, शाखाप्रमुख सुमित गावडे, संदीप बांदेकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, जिल्हा महिला संघटक किरण चेंदवणकर, उपतालुका प्रमुख नरेश वैद्य, उपजिल्हाप्रमुख उत्तम तावडे, जिल्हा सचिव आनंद चोरघे, तालुका सचिव संजय राऊत, विधानसभा संघटक सुरेंद्र सिंह, शहरप्रमुख विवेक पवार, रोहन चव्हाण, शहर संघटक वंदना नांदविकर, युवासेना सहसचिव भूमीश सावे, जिल्हाधिकारी अतुल मोटे, प्रतीक जाधव, निशांत बिर्जे, रोहन पठारे, रूपेश चव्हाण अभिजित सांगळे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




























































