
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज केला असून, येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पोलीस दलात या विवाहाची जोरदार चर्चा रंगल्याने या दोघींनी विवाह सोहळा तूर्तास रद्द केल्याचे समजते.
दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत पोलीस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्त होत्या. त्याच काळात त्या इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात दोघींची नियुक्ती झाली. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याची माहिती एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांना मिळाली. कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याची माहिती आहे.
कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध करण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलीस प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्यात येणार आहे. दरम्यान, दोघींनी विवाहासाठी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला आहे. विशेष म्हणजे या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलीस दलात चर्चेत असलेले त्यांचे नाते आता अधिकृतपणे समोर आले आहे.
एकीकडून लिंगबदल उपचार सुरू
दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ती मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील आणखी एका महिला कर्मचाऱ्याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. जिल्हा बदलीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस दलात आलेल्या या कर्मचाऱ्याने शासनाची परवानगी घेऊन शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. शस्त्रक्रियेनंतर स्वतःची नोंद पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून करण्यात यावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्याने शासनाकडे केली आहे.




























































