
नोकरी मिळत नसल्याने तणावातून हैदराबादच्या विद्यार्थ्याने अमेरिकेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. साई प्रदीप असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. साई 2024 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट सॅन अँटोनियो येथे तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, साई प्रदीप मूळचा हैदराबादमधील दम्मईगुडा येथील रहिवासी होता. गेल्या चार महिन्यांपासून नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र नोकरी न मिळाल्याने तो तणावात होता, असे साईच्या कुटुंबीयांनी सांगितले. याच तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
साईचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्याची चुलत बहीण दीप्तीने ‘गो-फंड-मी’ मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रदीपचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी 35,000 डॉलर्सची मदत गोळा केली जात आहे. यातून उरलेली रक्कम त्याच्या पालकांच्या मदतीसाठी वापरली जाईल.


























































