Jammu Kashmir – 23 कश्मिरी पंडितांची हत्या, 28 वर्षानंतर पुन्हा होणार तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मिरमधील वांधामा हत्याकांडाचा तपास तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कश्मिरमधील गांदरबल जिल्ह्यातील वांधामा गावात जानेवारी १९९८ मध्ये दहशतवाद्यांनी २३ कश्मिरी पंडितांची हत्या केली होती. जम्मू-कश्मिरच्या राज्य तपास यंत्रणेने (SIA) या प्रकरणासह दहशतवादाच्या काळात झालेल्या कश्मिरी पंडितांच्या लक्षित हत्यांच्या अनेक जुन्या प्रकरणांचा तपास पुन्हा हाती घेतला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अशा अनेक प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सरवनंद प्रेमी कौल, टीका लाल टपलू यांच्या हत्या आणि १९९८ मधील वांधामा हत्याकांडाचा तपास SIA ने पुन्हा सुरू केला आहे. दहशतवादाच्या काळात झालेल्या हत्यांच्या प्रकरणांमध्ये दोषींना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जानेवारी १९९८ मध्ये वांधामा गावात चार कुटुंबांतील २३ कश्मिरी पंडितांची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. या हल्ल्यात केवळ एका १४ वर्षीय मुलाचा जीव वाचला होता.

SIA ने १९९० मध्ये कश्मिरी पंडित लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सरवनंद कौल प्रेमी आणि त्यांचा २४ वर्षीय मुलगा वीरेंद्र कौल यांच्या हत्येचा तपासही पुन्हा सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने १२ ऑगस्ट रोजी SIA ने जम्मू-कश्मिरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.

दरम्यान, कश्मिरी पंडित परिचारिका सरला भट यांच्या १९९० मधील बलात्कार आणि हत्या प्रकरणात SIA ने २९ जून रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात जम्मू-कश्मिर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख मोहम्मद यासिन मलिक आणि खुर्शीद अहमद चाकू यांना कथित मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी करण्यात आले आहे.

दहशतवादाच्या काळात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नसेल, तर अशी प्रकरणे पुन्हा उघडण्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी २९ जून २०२५ रोजी केली होती. त्यानंतर १ जुलै रोजी त्यांनी अधिकाऱ्यांना अशी प्रकरणे पुन्हा उघडण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्राधान्याने सरकारी नोकरी देण्याची प्रक्रिया सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

SIA ने १९८९ मध्ये न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येप्रकरणीही नागरिकांकडून माहिती मागवली आहे. तसेच १९९० मध्ये मीरवाइज मौलवी फारूक यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.