
सोशल मीडियावर साखरेच्या वाढत्या दरावर उपरोधिक टिप्पणी करणारी पोस्ट करणे जौनपूरमधील एका सरकारी अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ‘चाय खतरे में है मित्तर, चीनी पहुंच गई सत्तर’ अशी पोस्ट फेसबुकवर केल्यानंतर शाहगंज तहसीलमध्ये कार्यरत लेखपाल अशोक कुमार यादव यांना तातडीने निलंबित करण्यात आले. रविवारी त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट केली होती. पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तहसील प्रशासनाने तातडीने कारवाईचे पत्र जारी केले.
अशोक कुमार यादव यांनी रविवारी आपल्या फेसबुक पेजवर साखरेच्या वाढलेल्या किमतीवर भाष्य करत ‘चाय खतरे में है मित्तर, चीनी पहुंच गई सत्तर’ असे लिहिले. साखरेचा दर ७० रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही उपरोधिक पोस्ट केली होती. पोस्ट केल्यानंतर काही वेळातच ती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर कुणीतरी ही पोस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली.
पोस्टची माहिती मिळताच शाहगंज तहसील प्रशासन सक्रिय झाले. प्रशासनाने संबंधित पोस्टबाबत माहिती गोळा करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लेखपालावर तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
सरकारी सेवेत असताना कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यापासून दूर राहावे, असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे. अशा पोस्टमुळे विभागाची प्रतिमा खराब होऊ शकते तसेच वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित लेखपालाची पोस्ट आचरण नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.




























































