अभिप्राय – सृजनाचा आनंदानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुधाकर वसईकर

मोकळ्या-ढाकळ्या मनाचा, संवेदनशील कवी म्हणून प्रसिद्ध असलेले संदेश ढगे यांचा संवेदना प्रकाशन प्रकाशित ‘नवा संग्रह’ हाती आला. कवितेविषयीचे संग्रहातील मनोगत ‘मनातलं’ वाचूनच काव्यसंग्रह वाचण्याची उत्सुकता वाढत गेली. ओघवतं तितकंच प्रामाणिक मनोगतात कवितेविषयी कवीची आस्था तर प्रकट होतेच, पण कविता कशी लिहावी, कवीची भावावस्था आणि त्याला असलेली असोशी तीव्रतेने आली आहे. मनातील भावभावनांचा जणू हिसाबकिताबच मिश्कीलतेने मांडला आहे.

‘माझा दावा आहे’ कवितेच्या सुरुवातीलाच कवी आधुनिक-बिधुनिक लिहिण्याचा दावा करतो. तेव्हा कविता आत्मस्तुतीपर वाटते. मात्र कवितेच्या मध्यावर काही ओळी येतात…

शोध ही आपली परंपरा नाही

अशा थाटात वासलात लावतात पारंपरिक

तेव्हा कविता टीकेच्या स्वराकडे वळते. मित्र समजावणीच्या स्वरात कवीला सांगतो, हे तर सगळं जुनंच सांगितलंय आणि ’ज्ञानेश्वरी’ वाचण्याचा सल्ला देतो तेव्हा कवी खडबडून जागा होऊन कवितेच्या उपसंहारात म्हणतो…

आणि मी माझ्या पाच संग्रहासोबत

मागे फेकला जातो आठशे वर्षे

आजही आपण ज्ञानेश्वर माऊलींची ‘विश्वची माझे घर…’ प्रार्थना म्हणतो. आजतागायत मराठी साहित्यात समस्त साहित्यिकांनी विपुल लेखन केले. समकालीन बदलत्या परिस्थितीचे चित्रण करताना ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदानच वेळोवेळी सांगितले आहे. त्याच्या पुढे जाऊन काही लिहिले जात नाही, अशी खंतही प्रतीत होते. अनेकार्थाने ही कविता वाचकांसमोर येते.

 ‘कुत्रा’, ‘पुन्हा निरक्षर झालो नाही’, ‘पतंग’, ‘प्रवास’, ‘भंगारवाला’, ‘एक आठवण शाळेबाहेरची’ आदी मुक्त शैलीतील कवितेतून बदलत्या जगाचे, जगण्याच्या घटनांचे, मानवी नात्यांचे चित्रण रंजकतेने आणि प्रभाविपणे केले आहे.

सकाळी रस्त्याने मॉर्निंग वॉकला जाताना बऱयाचदा फूटपाथवर बिस्किटे इतस्त: पडलेली दिसतात. जी कुत्र्यांना खाण्यासाठी टाकलेली असतात. मात्र त्यांनी ती त्यागल्यामुळे एकप्रकारे अन्नाची नासाडी होते. हे पाहून कवी व्यथित होतो आणि ‘कुत्रा’ कवितेत स्वातंत्र्य, स्वैराचार व माणसाचा लहरी स्वभाव यावर भाष्य करतो.

सोशल माध्यमांच्या मायाजाळात, आभासी जगतात साक्षर माणूस गुरफटतोय. याचे विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. माहितीची शहानिशा न करताच ती पुढे ढकलण्याची अहमहमिका समाजाला घातक ठरतेय. जबादारीने कागदावर लिहिणं वेगळं आणि केवळ पीनवरील माहिती फास्टफॉरवर्ड करणं वेगळं. हे ‘पुन्हा निरक्षर झालो नाही’ कवितेत पुन्हा मित्र संवादातूनच प्रकर्षाने येतं.

तू विकत घेतली आहेस घातक काळी बाहुली

आता येतील तुझ्या वस्तीला

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे

अशा ओळींची कवितेतून थेट विधान करण्याची क्षमता अतिशय लक्षणीय आहे. नावीन्याचा ध्यास घेणारी संदेश ढगेंची कविता प्रयोगशील आहे. व्यक्तीच्या अंतर्मनातील दुःख, नैराश्य जीवनातील संघर्ष, दैनंदिन व्यवहारीक बोलीभाषेत मांडल्याने मनाला भिडतात. साध्यासुध्या शब्दांचा काळजीपूर्वक वापर, विस्तारात ना जाता संक्षेपाकडे कवीचा असलेला अधिक कल. सभोवारची ाtढरता, निसर्गाबद्दलची अनास्था ‘कायापालट’ कवितेत अत्यंत पोटतिडकीने नोंदविली आहे. कवीच्या वाडय़ातील, परसदारातील डेरेदार आंबा, कृश शेवगा, चिंचेचे झाडं तोडून टुमदार बंगला बने न्यारा म्हणत शहराचा विकास करायला निघालेली इथली व्यवस्था निष्ठुर आहे आणि ते कवीने कवितेत उतरवू नये याचीही तजवीज या ‘बनेल’ व्यवस्थेने करून ठेवलीय. हे कवी सहजसोप्या शब्दांतून रसिकांच्या मनावर बिंबवतो आणि कवितेच्या उपसंहारात पुढील ओळींतून ठाम आशावाद सहज पेरून जातो.

तरीही वारा होऊन गावभर

मी हुंगून आणले शब्द

आणि पुन्हा उभे केले साम्राज्य

 ‘उंबरठा’, ‘नवे घर’, ‘हत्ती’ या अल्पाक्षरी, अर्थवाही, खोल आशयाच्या अनेकार्थी, उल्लेखनीय कविता सर्वसामान्यांच्या जवळ जाणाऱया आहेत. त्यांच्या रोजच्या जगण्याच्या घटनांनी व्यतीत होऊन, समरसून लिहिलेल्या कविता सृजनाचा आनंदानुभव देणाऱया आहेत.

संग्रहात 52 कविता आहेत. अल्पाक्षरी कवितेतून जगण्याचं साधं तत्त्व प्रामाणिकपणे मांडलं आहे. वरवर सहजसोपी, साधी वाटणारी कविता मात्र ओळीगणिक अर्थात शीर्षकापासून ते कवितेच्या परिसंहारापर्यंत हरेक टप्प्यावर रसिकांना विचार करण्यास प्रवृत्त करते. विचार करतो नि मग पुढे जातो. संग्रह पूर्ण वाचून झाल्यावरही प्रत्येक कविता मनात उरते. मुक्तछंदात लिहिलेल्या विधानात्मक कवितेचं हे मोठं यश आहे.