
नेपाळमधील जलप्रलयाच्या भीषण दुर्घटनेतून महाराष्ट्रातील ३७ जणांचा गट सुदैवाने बचावला असून, आज हे सर्वजण सहीसलामत मायदेशी परतले. “आम्ही देवदर्शनासाठी नेपाळला गेलो होतो. आम्हीसुद्धा त्या दुर्घटनेचे बळी ठरलो असतो; पण व्हिसा मिळण्यास एक दिवसाचा उशीर झाला आणि हाच एक दिवस आमच्या पथ्यावर पडला. परमेश्वरानेच आम्हाला सुखरूप परत आणले,” अशी भावना मुंबईत परतलेल्या ३७ भाविकांनी व्यक्त केली.
अलिबागच्या चौल येथील ‘जय गिरनारी शिवदत्त ट्रस्ट’च्या वतीने ३७ भक्तांसाठी नेपाळ व तिबेट येथील धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १६ ते २९ ऑगस्ट असा या टूरचा कालावधी होता. २६ ऑगस्ट रोजी हे सर्वजण ‘सागा’ या ठिकाणी होते, आणि त्याच दिवशी ‘टिमुरे’ येथे भीषण जलप्रलयाची घटना घडली. त्यामुळे हे ३७ जण सुरक्षित स्थळीच राहिले. त्यानंतर भारतीय दूतावास आणि प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करून या सर्वांना आज इंडिगोच्या विमानाने मुंबईत आणले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
“आमची यात्रा १५ ते २८ ऑगस्ट अशी नियोजित होती, पण व्हिसा मिळण्यास एक दिवसाचा विलंब झाला. परिणामी, आम्ही १६ तारखेला नेपाळला पोहोचलो. टिमुरे येथे इमिग्रेशनचे सोपस्कार आटोपून आम्ही पुढच्या यात्रेला निघालो. तो एक दिवसाचा विलंबच आमचा जीव वाचवणारा ठरला,” असे कराडचे श्रीकांत ढवळे यांनी सांगितले.
“१५ तारखेलाच आम्ही काठमांडूला पोहोचलो असतो, तर आज कदाचित जिवंत परतलो नसतो. त्या भयंकर दुर्घटनेत आमचेही बरेवाईट झाले असते. कारण २६ तारखेला आम्हाला इमिग्रेशनसाठी टिमुरे येथे यायचे होते; पण सुदैवाने तसे झाले नाही,” असे बोरिवली येथे राहणाऱ्या शमा साठे आणि पूनम सबनिस यांनी सांगितले.
आम्ही वाचलो, पण अनेक जण जिवाला मुकले
“आज आम्ही घरी परतलो याचा आनंद नक्कीच आहे. एक दिवसाचा विलंब आम्हाला जीवदान देणारा ठरला. परंतु, त्या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले. अनेक तरुण आणि लहान मुलेही प्राणास मुकली, ही अत्यंत वेदनादायी बाब असून मनाला चटका लावणारी आहे,” अशा शब्दांत सर्वांनी दुःख व्यक्त केले.
ती बातमी ऐकली आणि हादरलो!
-
राकेश जितेकर: “कैलास पर्वताची तीन दिवसांची परिक्रमा केल्यानंतर आम्ही २५ तारखेला पुन्हा सागा येथील हॉटेलवर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ तारखेला आम्हाला इमिग्रेशनसाठी टिमुरे येथे पोहोचायचे होते. आम्ही निघण्याची तयारी करत असतानाच भयंकर जलप्रलयाची बातमी कानावर पडली. ते ऐकून आम्ही हादरून गेलो, काही सुचेनासे झाले. परंतु परमेश्वराची कृपा होती आणि सुदैवाने आम्ही त्या दुर्घटनेच्या ठिकाणापासून शेकडो किलोमीटर दूर होतो.”
-
वर्षा करी (हुबळी): “१८ तारखेला आम्ही टिमुरे येथे इमिग्रेशन पूर्ण केले आणि आमची धार्मिक यात्रा सुरू झाली. आम्ही सागा येथे पोहोचलो आणि पुन्हा घरी जाण्याची तयारी केली. कैलास पर्वताची परिक्रमा तसेच इतर धार्मिक स्थळांचे दर्शन झाल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. परंतु ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’ याचा प्रत्यय आम्हाला आला. वास्तव्यात २६ तारखेला आम्हाला इमिग्रेशनसाठी टिमुरे येथे उपस्थित राहणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. त्या दिवशी सद्गुरूंनी आम्हाला सागा येथेच थांबवले आणि आमची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली.”


























































