
नेपाळच्या महाप्रलयाने सर्वत्र हाहाकार उडाला असून महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांचा अजून ठावठिकाणा लागलेला नाही. त्यात ठाण्यातील जोशी व पाटणकर कुटुंबाचाही संपर्क होत नसल्याने नातेवाईक प्रचंड चिंतेत आहेत. सरकारच्या विविध यंत्रणांशी ते संपर्क साधत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील जोशी व पाटणकर कुटुंबाचा शोध घेतला जात आहे.
नेपाळमधील महापुरानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक विविध भागांत अडकले आहेत. ठाण्यातील जोशी व पाटणकर दाम्पत्य प्रथमच नेपाळला गेले आहेत. समीर जोशी व अपर्णा जोशी यांनी २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान ठाण्यातील भावाशी संपर्क साधला. त्यांनी एक फोटोही शेअर केला व व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट केले. पण त्यानंतर जोशी दाम्पत्याचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत आहे.
बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये ठाण्यातील निवृत्त आयटी सल्लागार रेखा व सतीश पाटणकर यांचाही समावेश असून सतीश यांचे भाऊ संजय पाटणकर हे विविध यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी सकाळी इमिग्रेशन सुरू असताना पाटणकर दाम्पत्याने घरी फोन केला होता. ‘गुरुवारी आम्ही सीमा ओलांडून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत,‘ असे त्यांनी सांगितले. पण त्यानंतर संपर्कच तुटला आहे.
अमेरिकेतूनही प्रयत्न
नेपाळच्या संकटात अडकलेल्या पाटणकर दाम्पत्याची अंकुर व अपूर्वा ही दोन मुले सध्या अमेरिकेत असून आपल्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी त्यांनी तेथून प्रयत्न सुरू केले आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अन्य साधनांचा वापर केला जात असून जोशी व पाटणकर दाम्पत्य लवकरात लवकर सुखरूप आपल्या घरी यावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.


























































