राष्ट्रपतींसोबत सावली सारखं राहणाऱ्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती घेतली, नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सहाय्यक (एडीसी) म्हणून काम करताना देशभरात विशेष प्रसिद्धी मिळवलेले मेजर ऋषभ सिंग सांब्याल यांनी हिंदुस्थानी सैन्यातून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आहे. आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा दिल्यानंतर, सांब्याल यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत डिजिटल फोटो लायब्ररीमध्ये त्यांची ‘निवृत्त माजी एडीसी’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

अत्यंत शिस्तबद्ध, शांत स्वभाव आणि राष्ट्रपतींसोबतच्या कार्यतत्परतेमुळे मेजर सांब्याल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले होते. पावसात राष्ट्रपतींवर छत्री धरण्यापासून ते अधिकृत कार्यक्रमांदरम्यान त्यांची काळजी घेण्यापर्यंतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले होते. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ‘नॅशनल क्रश’ अशी पदवीही दिली होती. एडीसी म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा स्पेशल फोर्सेसमध्ये operational भूमिकेत परततील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांनी थेट लष्करी सेवेतूनच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना ऋषभ सिंग सांब्याल यांनी स्पष्ट केले की, वर्दी घालणे हे त्यांचे बालपणापासूनचे स्वप्न होते आणि लष्कर सोडण्याचा विचार त्यांनी कधी केला नव्हता. मात्र, आयुष्यात अशा काही परिस्थिती आणि क्षण येतात जे जीवनाची दिशा बदलतात. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे घेण्यात आला असून, यात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच भविष्यातही वेगवेगळ्या माध्यमातून देशासाठी योगदान देत राहू, असे त्यांनी नमूद केले.

जम्मू येथील लष्करी परंपरा असलेल्या डोग्रा राजपूत कुटुंबातील असलेल्या मेजर सांब्याल यांनी 2021 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात जाट रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्यांनी 4 पॅरा (स्पेशल फोर्सेस) मध्ये स्वेच्छेने प्रवेश करत प्रतिष्ठेचा ‘बलिदान बॅज’ मिळवला होता. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि भारतीय लष्करी अकादमीतील (IMA) प्रशिक्षण मिळून त्यांनी संस्थेत सुमारे 12 वर्षे आणि कमिशन अधिकारी म्हणून 8 वर्षे सेवा बजावली आहे.