यशच्या ‘टॉक्सिक’ची पहिल्या दिवसानंतर कमाईत घसरण, तरी चित्रपटाने गाठला 255 कोटींचा टप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता यशच्या टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरूच आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी सुरुवात केली असली, तरी त्यानंतरच्या दिवसांत हिंदुस्थानातील कमाईत सातत्याने घट पाहायला मिळत आहे. मात्र, या घसरणीनंतरही चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 255 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. शनिवार हा सुट्टीचा दिवस असूनही ‘टॉक्सिक’च्या हिंदुस्थानातील नेट कमाईत काहीशी घट झाली. चौथ्या दिवशी चित्रपटाने हिंदुस्थानात 17 हजार 612 शोमधून 25.15 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे हिंदुस्थानातील चित्रपटाची एकूण नेट कमाई 191.10 कोटी रुपये झाली आहे.

हिंदुस्थानच्या ग्रॉस कमाईचा विचार केला तर ‘टॉक्सिक’ने आतापर्यंत 228.25 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाची कामगिरी सुरू असून, शनिवारी 4 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई 27.25 कोटी रुपये झाली आहे. या आकडेवारीनुसार ‘टॉक्सिक’ची आतापर्यंतची जागतिक ग्रॉस कमाई 255.50 कोटी रुपये झाली आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी हिंदुस्थानात तब्बल 101.10 कोटी रुपयांची नेट कमाई करत जोरदार सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली. दुसऱ्या दिवशी त्याने 37.65 कोटी रुपये कमावले. म्हणजे पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमाईत सुमारे 62.8 टक्क्यांची घट झाली. तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने 27.20 कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यानंतर चौथ्या दिवशी कमाई आणखी कमी होऊन 25.15 कोटी रुपयांवर आली. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी झालेली घट तुलनेने कमी आहे. कमाईत सातत्याने होत असलेली ही घसरण पाहता ‘टॉक्सिक’चा आगामी दिवसांतील बॉक्स ऑफिस प्रवास कसा राहतो, याकडे आता चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.