ICC चा श्रीलंकेला मोठा झटका! थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच यजमानपद काढून घेतलं, कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डामध्ये सरकारच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या अंतरिम प्रशासनाचा कारभार सुरू आहे. मात्र, ICC ला हे मान्य नाही. कारण आयसीसीच्या नियमांनुसार क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप नसावा. याच कारणामुळे ICC ने कठोर निर्णय घेत श्रीलंकेकडून महिला चॅम्पियन ट्रॉफीच यजमानपद काढून घेतलं आहे.

महिला चॅम्पियन्स ट्रॉफी ही महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळवली जाणार असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुढील वर्षी 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान या स्पर्धेचे सामने पार पडणार आहेत. एकूण सहा संघांच्या सहभागासह रंगणाऱ्या या मेगा इव्हेंटचे नवीन यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले जाणार, याचा अंतिम निर्णय आता आयसीसीच्या आगामी बैठकीत घेतला जाईल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या ट्रान्सफॉर्मेशन कमेटीचे सचिव प्रकाश शैफ्टर यांनी ‘संडे टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून, ही स्पर्धा आता श्रीलंकेतून अन्यत्र हलवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

आयसीसीने याआधीच श्रीलंका क्रिकेटच्या प्रतिनिधींना आपल्या बोर्ड बैठकीत सहभागी होण्यास मज्जाव केला होता, कारण बोर्डाचा कारभार सध्या एका ट्रान्सफॉर्मेशन कमेटीद्वारे चालवला जात आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात एका अधिकृत निवेदनाद्वारे आयसीसीने श्रीलंकेला लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. आयसीसी बोर्डाने श्रीलंका क्रिकेटच्या बदलत्या संविधानाच्या दिशेने झालेल्या प्रगतीची दखल घेतली असली, तरी जोपर्यंत बोर्डात लोकशाही मार्गाने निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत श्रीलंकेचा आयसीसीच्या बैठकींमधील सहभाग अनिश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.