
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आई कमला आणि मामा विजय राय यांना अटक केलं आहे. आई आणि मुलीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास ‘ऑनर किलिंग’च्या दिशेनेही करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय आयुषीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच मुलाशी लग्न करायचं होतं. मात्र, आईचा या लग्नाला विरोध होता. यामुळे दोघींमध्ये सातत्याने वाद होत होते. 26 ऑगस्ट रोजी देखील याच कारणांमुळे माय-लेकींमध्ये वाद झाला. मात्र, हा वाद दोघींच्या आयुष्यातला शेवटचा वाद ठरला. संतापलेल्या आईने मुलीचा मामा म्हणजेच विजय राय याला सोबत घेत आयुषीची गळा आवळून हत्या केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन न करताच कुटुंबीयांनी आयुषीच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. मात्र, पोलिसांना वेळीच घटनेची माहिती मिळाली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 29 ऑगस्ट रोजी मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर पिपलानी पोलिसांनी तत्परता दाखवत आई आणि मामाविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा आणि अंतिमसंस्काराची तयारी करण्यामागील नेमक्या कारणाचा सखोल तपास करत आहेत.























































