लुधियानामध्ये ISI च्या एजंटला अटक; चिनी सीसीटीव्हीद्वारे हेरगिरी करणारा दुकानदार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील लुधियाना येथे एका दुकानदाराला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा आरोपी चिनी बनावटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सुरक्षा यंत्रणांना या दुकानदाराच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सातत्याने संपर्कात होता. देशातील काही संवेदनशील ठिकाणांवर आणि हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तो चिनी बनावटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करत होता. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक अ‍ॅक्सेस तो थेट पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सना पुरवत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या दुकानातून आणि घरातून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या हेरगिरीच्या नेटवर्कमध्ये त्याचे स्थानिक पातळीवर आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा शोध यंत्रणा घेत आहेत.