
पाकिस्तानी नौदलाने हिंदुस्थानच्या सीमेजवळ मोठी लष्करी कवायत घेतली आहे. पाकिस्तान नौदलाने या कवायतीचा व्हिडीओही जारी केला असून त्यामध्ये फ्लीट ऑपरेशन, कॉम्बॅट ट्रेनिंग आणि युद्धासाठीची तयारी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानमधील वादग्रस्त सर क्रीक परिसरातील दृश्यांचाही समावेश आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील सागरी सीमावादाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये पाकिस्तान नौदलाचे प्रमुख अॅडमिरल नावीद अशरफ हे करार-द रेंटलेस स्ट्रायकर या कार्यक्रमातील सरावाची पाहणी करताना दिसत आहेत. सुरक्षा अधिकाऱयांच्या माहितीनुसार, 16 ते 22 ऑगस्टदरम्यान बलुचिस्तान आणि सिंधच्या किनारी भागातील अनेक ठिकाणी या कवायती घेण्यात आल्या. यामध्ये पाकिस्तानी नौदलाची जहाजे, जवान तसेच मरीन कमांडोंनी सहभाग घेतला.
अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावर लक्ष्य
कवायतीचा उद्देश अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील समुद्री धोक्यांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानची तयारी दाखवणे हा होता. कवायतीमध्ये विविध नौदल सरावांचा समावेश असल्याचे समजते.

























































