
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील विविध भागांमध्ये गोळीबार, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आता नोणे जिह्यात दोन सशस्त्र गट आमनेसामने आले. या वेळी झालेल्या भीषण गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेलियांगसँग युनायटेड फ्रेंट-कमसन आणि झेलियांगसँग युनायटेड फ्रेंट-जेनचुई या दोन सशस्त्र गटांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार झाला. शनिवारी पहाटे हे दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार धुमश्चक्री उडाली. यात जांगाईलिंग गॉनमेई (वय 37, रा. मणिपूर) या तरुणाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या सहा जणांपैकी पाच जणांना इंफाळ येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली, तर एका जखमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 250 हून अधिक मृत्यू
गेल्या साडेतीन वर्षांपासून मणिपूर धुसमूसत आहे. मैतेई आणि कुकी समुदायामध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावरून हिंसाचार सुरू झाला आणि या हिंसाचारात आतापर्यंत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर 50 हजारांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. 2026 मध्येही विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या असून यात 20 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

























































