21 दिवसांनंतर लागला ‘निरवा’चा शोध, कुनोमध्ये 52 चित्ते, वन्य जीवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुनो राष्ट्रीय उद्यानात 21 दिवस बेपत्ता असलेली ‘निरवा’ ही मादी चित्ता सुखरूप सापडल्यानंतर तिला पुन्हा सुरक्षित कुंपणात हलविण्यात आले आहे. निरवा सुरक्षित सापडल्याने प्रकल्प अधिकाऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी या घटनेने वन्य जीव व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 कुनोचे क्षेत्र संचालक उत्तमकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  निरवा मादीच्या गळ्यातील सॅटेलाईट कॉलरचा संपर्क तुटला होता, पण आमच्या वन्य विभागाच्या टीमने अथक परिश्रम घेतले आणि निरवा अखेर तिच्या अधिवासात पोहोचली आहे.

 मादी चित्ता ‘निरवा’ गेली 21 दिवस बेपत्ता होती. तिच्या गळ्यातील सॅटेलाइट कॉलर अचानक निकामी झाल्याने वन विभागाची झोप उडाली होती.  पावसाळा, घनदाट जंगल, अपुरे मनुष्यबळ यामुळे निरवाला शोधायला अनेक अडचणी आल्या. मात्र, तब्बल तीन आठवडय़ांच्या अथक शोधानंतर वन कर्मचाऱयांनी निरवाला सुरक्षितपणे शोधून काढले असून तिला पुन्हा सुरक्षित कुंपणात हलविण्यात आले आहे.

चित्त्यांची संख्या वाढली

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याचे ठरल्यानंतर 17 सप्टेंबरला नांबिया येथून 8 व दक्षिण आफ्रिकेतून 12 असे चित्ते कुनोत सोडण्यात आले होते. त्यांचा मोठा वंश विस्तार झाला. सध्या देशात एकूण 52 चित्ते असून ते दोन वेगवेगळ्या अधिवासांमध्ये वसलेले आहेत. यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात 49 आणि गांधी सागर अभयारण्यात 3 चित्ते आहेत.

रेडिओ कॉलरचा बिघाड व चौकशीची मागणी

निरवा अखेर सुखरूप सापडली, पण अत्यंत महागडा आणि आधुनिक मानला जाणारा रेडिओ कॉलर अचानक कसा निकामी झाला? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वन्य जीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी  केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री तसेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. रेडिओ कॉलर का फेल झाला, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  कुनोमध्ये अलीकडेच झालेला ‘इलू’ आणि ‘रुबी’ या दोन महत्त्वाच्या स्निफर डॉग्सचा संशयास्पद मृत्यू, अभयारण्यातील व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि शिकारीच्या संभाव्य धोक्यांबाबतही स्वतंत्र तपासाची मागणी करण्यात आली आहे.