
राज्याच्या परिवहन मंत्र्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) दिल्या जाणाऱ्या स्मार्ट कार्डवर मराठीचा विसर पडला आहे. प्रशासकीय कारभार मराठी भाषेमध्येच करावा असा कायदा राज्यात असताना आणि एसटीच्या स्मार्ट कार्डचे श्रेय वारंवार घेणाऱ्या महायुती सरकारला एसटीच्या स्मार्ट कार्डवरच मराठी भाषेचे वावडे का, असा सवाल केला जात आहे. राज्यातील महिला आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासभाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येते. तसेच 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यभर विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची ओळख निश्चित व्हावी यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड स्वरूपातील ओळखपत्रे देण्याची मोहीम एसटी प्रशासनाने राबवली. मात्र हे स्मार्ट कार्ड इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे.



























































