
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाचे प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि गुलाल-फुलांची उधळण करीत हजारो मुंबईकर लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झाले. त्यामुळे लालबाग, परळ, चिंचपोकळी, भायखळा, गिरगाव, मुंबई सेंट्रल येथील रस्ते गणेशभक्तांच्या अलोट गर्दीने फुलले होते.
मुंबई शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विकेण्डच्या सुट्टीचा योग साधत सलग दोन दिवस गणरायांच्या आगमनाचे नियोजन केले. त्यामुळे रविवारीही लालबाग, परळ परिसरातील कार्यशाळांतून सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गणराया मंडपाच्या दिशेने रवाना झाले. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करीत गणेशोत्सव मंडळांनी आगमनाची जय्यत तयारी केली. मंडळांचे कार्यकर्ते अत्यंत सावधगिरीने गणरायाची मूर्ती पुढे मार्गस्थ करीत होते. या वेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दुपारपासून सायंकाळपर्यंत भक्तांची संख्या झपाट्याने वाढली आणि लालबाग, परळ परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. लालबाग-परळ परिसरातून उपनगरांतही अनेक गणरायाच्या मूर्ती रवाना झाल्या. उपनगरांतील मंडळांनी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या ट्रक-टेम्पोमधून महामार्गावरून गणरायाला मंडपात नेले. त्यामुळे कुलाब्यापासून पूर्व उपनगरात चेंबूर, मुलुंडपर्यंत तसेच पश्चिम उपनगरांत गोराई, दहिसरपर्यंत रविवारी संपूर्ण दिवसभर गणरायाच्या आगमन मिरवणुकांचाच उत्साह होता. आगमन सोहळ्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त गर्दी केली होती. गणरायाच्या देखण्या, आकर्षक मूर्ती मोबाईलच्या कॅमेऱ्यांत टिपण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडाली होती.
चंदनवाडीच्या गणपतीची नेत्रदीपक मिरवणूक सोहळा
अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा नेत्रदीपक मिरवणूक सोहळा पार पडला. परळ रेल्वे वर्कशॉप येथील सिद्धेश दिघोळे यांच्या श्रीगणेश मूर्ती कारखान्यात साकारलेली 26 फुटी अतिभव्य शंकराच्या रूपात नंदीवर आरुढ झालेली श्री गणेशाची मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. मिरवणुकीत ग्रॅण्ट रोड, गिरगाव, ठाकूरद्वार, चिराबाजार, चंदनवाडीपर्यंत हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते.
मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त
विकेण्डला हजारो गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेत मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांवर तगडा बंदोबस्त दिला. आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले. महिला सुरक्षेबाबतही विशेष खबरदारी घेण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समाजकंटकांच्या कृत्यांवर वॉच होता. त्यामुळे आगमन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्याचे एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
वाहतुकीचे चोख नियोजन
गणेशभक्तांच्या गर्दीच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे चोख नियोजन केले होते. त्यामुळे मोठमोठ्या मूर्ती रस्त्यावरून मार्गस्थ असतानाही वाहतुकीला अडसर न आल्याचे चित्र होते. पोलिसांच्या मदतीला विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर तत्पर होते. लालबाग व परळ परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती.



























































