
मुंबई शहरातील नामांकित गणेश मंडळाच्या आगमन सोहळ्यात चोरट्याने चांगलीच हातसफाई केली आहे. चोरट्याने महागडे मोबाईल, सोनसाखळी चोरी केल्या आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तीन गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.
शनिवारी मुंबईतील अनेक नामांकित मंडळांचे बाप्पा उत्सव मंडपाकडे रवाना होत होते. आगमन सोहळ्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात होता. लालबागमधील एक प्रसिद्ध मंडळाचा बाप्पा मंडपाच्या दिशेने निघाला तेव्हा अचानक गर्दी वाढली. याच गर्दीचा चोरट्याने फायदा घेतला. चोरट्याने 8 लाख 27 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल चोरून पळ काढला. ज्याचे मोबाईल चोरीला गेले आहेत ते नागपूर, मीरा-भाईंदर, बोरिवली, लालबाग, डोंबिवली, कुर्ला, गिरगाव खेतवाडी, मालाड, सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.
त्याचप्रमाणे एका चोरट्याने एका तरुणाची सोनसाखळी चोरली. लालबागच्या दिशेला असलेल्या सिग्नलजवळ तो तरुण उभा होता. गर्दी वाढल्यावर अज्ञात चोरट्याने त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. चैन चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने त्या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र गर्दीतून चोरट्याने वाट काढत पळ काढला. त्याचप्रमाणे लोअर परळ येथे राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने खेचून पळ काढला. चोरट्याने मंगळसूत्र जोरात हिसकावल्याने महिलेच्या गळ्याला दुखापत झाली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.



























































