मध्य रेल्वेकडून व्हेटिव्हर गवताच्या जैवअभियांत्रिकीचा अवलंब, 5300 चौरस मीटर क्षेत्रात वृक्षारोपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे घाट विभागांमध्ये मृदा धूप रोखण्यासाठी आणि व्हेटिव्हर गवतावर आधारित जैवअभियांत्रिकीद्वारे अखंड रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना अवलंबत आहे. त्यानुसार दक्षिण पूर्व घाट विभागात 5300 चौरस मीटर क्षेत्रात वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

भोर घाट (कर्जत-लोणावळा) आणि थाळ घाट (कसारा-इगतपुरी) हे घाट विभाग पावसाळ्यात मृदा धूप, पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह, दगड कोसळणे आणि उथळ भूस्खलन यांसारख्या धोक्यांसाठी संवेदनशील आहेत. त्यामुळे सुरक्षित रेल्वे वाहतुकीसमोर गंभीर आव्हान उभे राहते. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वे आता नैसर्गिक उतार स्थिरीकरण उपाय म्हणून व्हेटिव्हर गवताचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ‘व्हेटिव्हर सिस्टीम’अंतर्गत एक उच्च कार्यक्षम जैवअभियांत्रिकी वनस्पती म्हणून ओळखली जाणारी व्हेटिव्हर, माती स्थिर करणे, पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह कमी करणे, धूप झालेला गाळ अडवणे आणि उतारांची पुनर्स्थापना करणे यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. या वनस्पतीची मुळे दाट आणि प्रामुख्याने उभी वाढतात. ती 12 ते 24 महिन्यांत 3 ते 4 मीटरपर्यंत वाढतात. मुळांचे हे मजबूत तंतुमय जाळे मातीला बांधून ठेवते आणि मातीचा कातरण प्रतिरोध अंदाजे 30-40 टक्क्यांनी वाढवते. त्यामुळे भूस्खलनाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.