
केंद्रीय परीक्षांमधील गोंधळ सुरूच असून आता ‘नीट-पीजी’ परीक्षेला सरकारी अनास्थेचा फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे जयपूरमध्ये तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात रविवारी 2 लाख 65 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा दिली. देशातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 339 शहरांत 1,111 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. मात्र जयपूरच्या सीतापुरा परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ उडाला. परीक्षा शांततेत सुरू झाली खरी, मात्र काही वेळातच सिस्टीम व्रॅश होऊ लागल्या. अधूनमधून स्क्रीन काळे पडू लागले. सर्व विद्यार्थ्यांना असाच अनुभव येऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या सिस्टीम तब्बल 20 वेळा व्रॅश झाल्या. कॉम्प्युटर बंद होताच परीक्षा केंद्रावर कल्ला वाढला. विद्यार्थी आपसात प्रश्नोत्तरांची चर्चा करायला लागले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
बोर्डाने टीसीएसवर खापर फोडले
जयपूरच्या परीक्षा केंद्रावरील घोळानंतर राजकीय वातावरण तापले. काँग्रेससह अन्य विरोधकांनी सरकारवर व बोर्डाच्या कारभारावर हल्ला चढवला. टीकेची झोड उठताच एनबीईएमएसने जबाबदारी झटकत परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीवर खापर पह्डले. टीसीएसकडून अंतर्गत वीजपुरवठय़ांमध्ये अडथळे येत असल्यामुळे हा प्रकार घडला, अशी सारवासारव एनबीईएमएसने केली.
5 सप्टेंबरला पुन्हा परीक्षा
परीक्षा नीट देता न आल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासनाची पळापळ झाली. केंद्रावर घडलेला प्रकार वरिष्ठांना कळवण्यात आला. अखेर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेज (एनबीईएमएस) ने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानुसार या केंद्रावर आलेल्या 2445 विद्यार्थ्यांची परीक्षा 5 सप्टेंबरला पुन्हा होणार आहे.



























































