
मोखाडा, खोडाळा, विहीगाव आणि पालघर, वाडा, देवगाव परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघा पंधरवाडा उरलेला असताना प्रशासनाने हे खड्डे भरलेले नाहीत. त्यामुळे बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गणेशोत्सव पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिवासी भागातही या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवात पालघरमध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी येतात. मात्र सध्या पालघर, वाडा, देवगाव आणि मोखाडा, खोडाळा, विहीगाव या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवर पडलेले सर्वच खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश कडू यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
रस्ते खड्ड्यात गेले असल्याने रुग्ण, महिला, वृद्ध व शाळकरी मुलांना शारीरिक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालक आणि मालक हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवापूर्वी मोखाड्यातील दोन्ही राज्यमार्गांवरील खड्डे बांधकाम विभागाने भरून काढावेत. जर हे खड्डे भरले गेले नाही तर स्थानिक नागरिकांना तीव्र आंदोलन छेडावे लागले, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आकाश कडू यांनी दिला आहे.



























































