शहापूरच्या बोंद्रे पाड्यात ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार, स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची परवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किन्हवली गावात स्मशानभूमी नसल्यामुळे ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहापूर तालुक्यातील बोंद्रे पाड्यामधील ग्रामस्थांवर ओढावली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येतात. पेटलेली चिता विझू नये यासाठी चितेवर ताडपत्री धरावी लागते. पावसाळ्यात या अडचणीला वारंवार सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बोंद्रे पाड्यातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावातील अर्ध्या भागासाठी अद्याप स्वतंत्र व सुरक्षित स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मृत व्यक्तीच्या पार्थिवावर उघड्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागतात. सध्या पावसाळा असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेटलेली चिता विझू न देण्यासाठी ग्रामस्थांना चितेच्या वर ताडपत्रीचे तात्पुरते छत तयार करावे लागत आहे. हे छत करताना धोका होण्याचीही शक्यता आहे. प्रत्येक पावसाळ्यात या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.