
मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकातील रेल्वे ट्रॅक शिफ्टिंग आणि फलाटाची लांबी वाढवण्याच्या कामासाठी तब्बल १६ दिवस रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमध्ये लोकल सायडिंगला गेल्या असल्या तरी एक्स्प्रेस मात्र सुसाट आहेत. त्याचा सर्वाधिक फटका कसारा, आसनगावसह शहापूरदरम्यानच्या लोकल सेवेला बसला असून प्रवाशांची कोंडी झाली आहे. मुंबई, ठाणे या भागात येणाऱ्या चाकरमान्यांचे घरी पोहचण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून पडले आहे.
कर्जतच्या दिशेने १५ डब्यांच्या लोकल सुरू झाल्या, मात्र कसारा मार्गावरील ट्रॅक शिफ्टिंग आणि फलाट लांबी वाढीची कामे अजूनही संथ गतीनेच सुरू आहेत. टिटवाळा स्थानकातील याच कामासाठी रेल्वे प्रशासनाने २८ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत रात्री ११.३० पासून पुढे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. या मेगाब्लॉकमध्ये आणखी काही दिवसांची वाढ होण्याची शक्यता असून वेगवेगळ्या तारखांना रात्रीच्या आणि पहाटेच्या वेगवेगळ्या लोकल रद्द झाल्याने मुंबई-ठाणे कल्याणकडे जाणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचे गणितच कोलमडले आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी कोणती गाडी रद्द आहे याचा अंदाज बांधताना प्रवाशांचा गोंधळ उडत असून दररोज प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याची कसरत करावी लागते. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे कसे, कोणती पर्यायी गाडी पकडायची, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे.
एक्स्प्रेसमधून प्रवासाची परवानगी द्या !
एकीकडे लोकल रद्द करून प्रवाशांची त्रेधा सुरू असताना दुसरीकडे मेल-एक्स्प्रेस मात्र धावत असल्याने या मेगाब्लॉकचा ‘मेगा’ फटका कसारा-आसनगावच्या चाकरमान्यांना बसला आहे. रद्द करण्यात आलेल्या लोकलच्या वेळेत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये लोकल प्रवाशांना प्रवासाची परवानगी देऊन हा त्रास कमी करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी केली आहे.
॥ आसनगाव, कसारा मार्गावर गेल्या काही वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने चाकरमानी प्रवाशांना प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या मार्गावर रेल्वेच्या कामांमुळे घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉक म्हणजे ‘मेगा’ त्रास होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.



























































