
नागोठणे बस स्थानक परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांना येथून चालणेही मुश्किल झाले होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांना हटवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
नागोठण्यामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बस स्थानक परिसरातील दुकानांसमोर लोखंडी पत्र्याचे शेड तसेच दुकानांपुढे रस्त्यावर व्यापारी सर्व सामान ठेवत होते. त्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत होती. या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे रस्त्यावर व पदपथावर चालणेही अवघड होऊन बसले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केलेल्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने नोटिसाही बजाबल्या होत्या. मात्र नोटिसांची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर तोडक कारवाई केली.
अतिक्रमणे हटवा
विशाल मेडिकल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली. यापुढेही शहारातील सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर अशीच धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. सोमवार सकाळपासून पुन्हा कारवाईचा धडाका लावण्यात येणार असल्याने उर्वरित अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण हटवावे अन्यथा ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करेल, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.




























































