मद्यपान सोडल्यानंतर आयुष्य खूप बदललं; विजय देवरकोंडाने सांगितला रोमांचक किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी ‘रोमंचकम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात विजयने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीसा धक्कादायक आणि मजेशीर खुलासा केला. मद्यपान सोडण्यापासून प्रेमात पडणे आणि त्यानंतर मन तुटण्यापर्यंतच्या अनुभवांबद्दल त्याने थेट भाष्य केले.

‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा भाऊ प्रणय रेड्डी वंगा यांच्या आगामी प्रॉडक्शन ‘रोमंचकम’च्या प्रमोशनल कार्यक्रमात विजय सहभागी झाला होता. यावेळी त्याला 2026 मधील सर्वात ‘रोमंचकम’ म्हणजेच रोमांचक क्षण कोणता होता, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विजयने केवळ आपल्या लग्नाचा उल्लेख न करता संपूर्ण आयुष्याचा मजेशीर अंदाजात आढावा घेतला. तो म्हणाला, “मी 1989 मध्ये जन्मलो. तेव्हापासून माझं आयुष्य प्रत्येक वर्षी रोमांचकच राहिलं आहे. खिशात पैसे असोत किंवा नसोत, ब्लेंडर्स प्राइड असो किंवा ग्लेनफिडिच असो, मी दारू प्यायचो. पण नंतर दारू सोडली.”

मद्यपान सोडण्यामागचं नेमकं कारण विजयने स्पष्ट केलं नाही. त्यानंतर त्याने आपल्या प्रेमजीवनाबाबतही मनमोकळेपणाने सांगितले. “मी प्रेमात पडलो. माझं मन तुटलं आणि माझं लग्न झालं. काहीही झालं तरी माझं आयुष्य रोमांचकारी होतं,” असे विजय म्हणाला. विजयच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी जोरदार टाळ्या आणि जल्लोष केला. त्याच्या या स्पष्टवक्तेपणामुळे कार्यक्रमातील वातावरण आणखी रंगले. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी विजयला त्याची पत्नी आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या प्रकृतीबाबतही विचारले. रश्मिका सध्या दुखापतीतून सावरत आहे. यावर विजयने सांगितले की, “ती ठीक आहे. तिला दुखापत झाली आहे, पण आता ती बरी होत आहे आणि घरी मजा करत आहे.” विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी ‘गीता गोविंदम’ (2018) आणि ‘डियर कॉम्रेड’ (2019) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 2020 पासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. रश्मिकाने विजयच्या घरातून फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले होते. त्यांच्या नात्याबाबत अनेकदा चर्चा झाली, मात्र दोघांनीही बराच काळ त्यावर अधिकृत भाष्य करणे टाळले. अखेर 2026 मध्ये त्यांनी आपल्या नात्याची पुष्टी करणारी संयुक्त पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्यांच्या लग्नाची बातमीही चर्चेत आली.