
दुचाकीवरून घरी परतत असताना चिनी मांजामुळे गळा कापल्याने जम्मू कश्मीरमध्ये माजी सैनिकाचा मृत्यू झाला. लखविंदर सिंग असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हा दोरा विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आर. एस. पुरा येथील मामका गावचे रहिवासी असलेले निवृत्त नायब सुभेदार लखविंदर सिंग हे बारी ब्राह्मणा येथील एका औद्योगिक युनिटमध्ये खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. रविवारी सायंकाळी ड्युटी संपवून ते घरी परतत होते. यादरम्यान त्यांच्या गळ्याभोवती दोरा गुंडाळला गेला आणि त्यामुळे गळा कापला गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जम्मू जिल्ह्यात या दोऱ्याचे उत्पादन, विक्री, खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि वापर यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बंदी असूनही, या दोऱ्याची बेकायदेशीरपणे विक्री सुरूच आहे. हा जीवघेणा दोरा विकणाऱ्यांविरुद्ध पोलीस आणि प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सिंग यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

























































