अ‍ॅमेझॉनने अचानक नोकरीवरून काढलं, आता मी अंडी विकतीये… नैराश्यातून बाहेर पडत सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही वर्षांपासून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीच प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग चिंतेत आहे. अनेकजण नैराश्यात गेल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या आहेत. असाच प्रकार अ‍ॅमेझॉनमधून नोकरी गमावलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत सुद्धा घडला. मारिया हर्षिता असे त्यांचे नाव असून मार्च 2026 मध्ये नोकरी गमावल्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरीसाठी अर्ज केले, अनेकांकडे रेफरेन्स मागितले. परंतू त्यांना नोकरी मिळाली नाही. मात्र, या अपयशातही त्यांना एक आशेचा किरण दिसला आणि उदयास आला कुक्कुटपालनाचा व्यवसाय.

मारिया हर्षिता यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहित आपल्या या प्रवासाची माहिती दिली असून त्यांच अनेकांनी कौतुक केलं आहे. “मला वाटले होते की मी सहज दुसरीकडे जॉब मिळवेन, पण तसे काहीच झाले नाही. एकापाठोपाठ एक रिजेक्शन्स मिळत गेले,” माझी ही वनवन पाहून माझ्या पतीने मला विचारसरणी बदलण्याचा सल्ला दिल्याच त्या म्हणाल्या आहे. दुसऱ्याच्या प्रॉडक्टचे व्यवस्थापन करण्यापेक्षा स्वतःचे काहीतरी का निर्माण करत नाही, असा प्रश्न त्यांनी तिला विचारला. या सल्ल्यानुसार या दांपत्याने घरामध्ये कोंबड्यांसाठी एक जागा तयार केली आणि सुरवातीसाठी 6 पिल्ले आणली. मात्र, सुरुवातीलाच एक मोठा अडथळा आला, कारण ती सर्वच्या सर्व 6 पिल्ले पुढे जाऊन कोंबडे निघाले.

त्यानंतर मारियाने आपल्या पतीला कोंबड्या आणण्यासाठी राजी केले. आपल्या मुलांना बाजारातील नव्हे, तर ताजे आणि पौष्टिक घरगुती अंडे मिळावेत हा तिचा उद्देश होता. त्यानुसार त्यांनी मोठी जागा बांधली, अधिक कोंबड्या आणल्या आणि हळूहळू अंड्यांचे उत्पादन सुरू झाले. मुले ताजे अंडे खाऊ लागली, उत्पादन वाढले आणि मग तिने अंड्यांची विक्री सुरू केली. पाहता पाहता तिने स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू केला आणि आज ती यशस्वीपणे अंड्यांची विक्री करत आहे.

 

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणते, “माझ्यायाजवळ आता माझे स्वतःचे प्रॉडक्ट (अंडी) आहे आणि मी ते विकत आहे. बाजारात मागणी आहे आणि मी पुरवठ्याद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या प्रक्रियेत मी खरोखरच ‘प्रॉडक्ट मॅनेजमेंट’ करत आहे आणि सोबतच माझ्या आवडीचे कामही करत आहे. हे अंडे अतिशय चवदार आहेत, तुम्ही शेवटचे ताजे अंडे कधी खाल्ले होते? मी आता माझ्या या व्यवसायासाठी ‘पॉवर बीआय’चा वापर करत आहे, ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मारियाची ही प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून युजर्सकडून त्यावर भन्नाट आणि मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.