पडद्याआडून – लग्नाच्या बोहल्यावरून प्रेमाच्या वळणावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

प्रेम आणि लग्न यांच्यात नेमका फरक किती? प्रेमात असताना जे गोड वाटते ते लग्नानंतर कुरबुरीचे कारण का बनते आणि लग्न झाल्यावर जुन्या प्रेमाची आठवण आली तर मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा डोकावतात का? या प्रश्नांना फार गंभीरपणे न घेता त्यांच्यातला विनोद शोधत रंगमंचावर आलेले नाटक म्हणजे ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची.’ स्वप्नील बारसकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित या नाटकात प्रेम, विवाह, नातेसंबंध, गैरसमज आणि नवरा-बायकोच्या कुरबुरींची मजेशीर गुंफण करण्यात आली आहे.

नाटकाचा नायक मोहन देसाई आपली मुलगी आदितीसोबत राहतो. त्याच्या पत्नीचे स्वातीचे निधन झाले असले तरी तिचा आत्मा त्या घरातून गेलेला नाही. उलट मोहनच्या आयुष्यावर आपला प्रभाव कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न सुरूच आहे. अशातच मोहनची बालपणीची मैत्रीण प्रणोती त्याला अचानक भेटते. तिच्यासोबत तिचा मुलगा विहान आहे. या भेटीने मोहनच्या वर्तमानात भूतकाळाची खिडकी उघडते आणि त्यातून पुढे घडत जाणाऱ्या घटनांमधून नाटकाचा विनोदी प्रवास सुरू होतो.

मृत पत्नीचा आत्मा, जुनी मैत्रीण, मुलगी आणि नव्या नात्याची शक्यता या सगळ्यांचा एकत्रित खेळ ही या नाटकाची गमतीदार मध्यवर्ती कल्पना आहे. त्यामुळे कथानकाला एक प्रकारच्या ‘फॅन्टसी कॉमेडी’ची किनार लाभते. मात्र लेखकाने त्याला केवळ भुताच्या करामतींपुरते मर्यादित न ठेवता नात्यांच्या मानसिकतेकडे वळवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. प्रेम आणि लग्न यांच्यातील अंतर, संसारात निर्माण होणारा विसंवाद आणि ‘आपलं माणूस’ गमावल्यानंतरही त्याच्याशी मनाने सुरू राहणारा संवाद हे विषय विनोदाच्या आडून डोकावत राहतात.

दिग्दर्शक संतोष पवार यांचं हे हातखंडा नाटक आहे. त्यांचा परिचित टच नाटकात ठळकपणे जाणवतो. त्यांचा स्वतःचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. छोटे-छोटे, काही वेळा मुद्दाम लाऊड केलेले प्रसंग, पात्रांच्या सततच्या हालचाली, वेगवान प्रवेश-निर्गमन, शब्दांचे खेळ, काही सूचक तर काही थेट कमेंट्स आणि पंचेस यांचा सढळ वापर हे पवार यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य. गंभीर होण्याची शक्यता असलेला प्रसंगही लगेच विनोदाकडे वळवण्याची त्यांची हातोटी इथेही दिसून येते आणि त्यामुळे नाटक कुठेही रेंगाळत नाही. एक प्रसंग संपतो न संपतो तोच दुसरा प्रसंग उभा राहतो.

मात्र याच वैशिष्ट्याची मर्यादाही आहे. सततचा आवाज, हालचाली आणि पंचेस यामुळे काही प्रसंगांमध्ये विनोदाचा परिणाम कमी होतो. प्रत्येक प्रसंगाने हशा मिळवायलाच हवा, या आग्रहामुळे पात्रांच्या भावविश्वाला पुरेशी उसंत मिळत नाही. तसेच काही गोष्टींत पुनरुक्तीचा दोष आढळतो. संतोष पवार यांनी स्वतःही नाटकात विनोदाबरोबर नात्यांमधील भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तो भावनिक स्तर आणखी थोडा खोलवर जायला हवा होता.

या नाटकाचा खरा ‘गेमचेंजर’ अर्थातच भाऊ कदम. मोहन देसाईची व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनय शैलीला अगदी चपखल बसणारी आहे. चेहऱ्यावरचे निरागस भाव, आवाजातील चढ-उतार, शरीराची लकब, गोंधळलेल्या माणसाची देहबोली आणि एखादा साधा संवादही पंचमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची क्षमता यामुळे नाटकाचा भार ते सहजपणे पेलतात. त्यांना दिलेले पंचेस ते यथास्थित टिपतात आणि हशे वसूल करतात. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीलाच एक स्वतंत्र ‘ऑरा’ आहे.

पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्नही निर्माण होतो. भाऊ कदम यांच्या लोकप्रियतेचा फायदा नाटकाला होतो की नाटकाची व्यक्तिरेखा भाऊ कदम यांच्या लोकप्रियतेच्या सावलीत जाते? भाऊ कदम रंगमंचावर आले की, प्रेक्षकांची नजर साहजिकच त्यांच्यावर खिळते. त्यामुळे इतर पात्रांना मिळणारी संधी आणि त्यांचा अभिनय काहीसा झाकोळला जातो असे वाटते. सगळ्या कलाकारांची केमिस्ट्री उत्तम आहे.

लेखनाच्या पातळीवर स्वप्नील बारसकर यांनी सर्वसामान्यांच्या परिचयाच्या विषयाला विनोदाचे रूप दिले आहे. नवरा-बायकोच्या कुरबुरी, जुन्या प्रेमाच्या आठवणी, नात्यांमधले गैरसमज आणि माणूस गमावल्यानंतर त्याच्या अस्तित्वाची मनात राहणारी छाया या सगळ्याला हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

साई पियुष यांचे गीत-संगीत नाटकाच्या मनोरंजनात्मक बाजूला पूरक ठरते. निर्मितीच्या पातळीवरही नाटकाला मोठ्या व्यावसायिक आवाक्याची जाणीव आहे. उत्तम कलाकारांची टीम, विनोदी दिग्दर्शन आणि भाऊ कदम यांचा चेहरा हे त्याचे बलस्थान आहे.

एकूणच ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे वैवाहिक जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे नाटक नाही, ते लग्न आणि प्रेमाच्या गुंतागुंतीकडे मिश्कीलपणे पाहणारे मनोरंजनप्रधान नाटक आहे. काही प्रसंग खळखळून हसवतात, काही केवळ हसवण्याच्या प्रयत्नात राहतात. भावनिक स्ताराला थोडी अधिक खोली आणि विनोदाला थोडा अधिक संयम मिळाला तर या नाटकाची दुसरी बाजूही अधिक सुंदरपणे खुलू शकते.

तरीही सध्या दोन घटक नाटकाला प्रेक्षकांपर्यंत खेचून आणतात- लग्नाच्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला दिसणारा आपला संसार आणि भाऊ कदम यांच्या अभिनयातून मिळणारा हमखास हास्याचा डोस. त्यामुळे संसाराच्या कुरबुरींना दोन घटका हसत सामोरे जायचे असेल, तर या नाटकाच्या दाराची कडी उघडायला हरकत नाही.

  • नाटक: पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची

  • लेखक: स्वप्नील बारसकर

  • दिग्दर्शक: संतोष पवार

  • कलाकार: मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब, साकार देसाई आणि भाऊ कदम

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे

  • प्रकाशयोजना: शीतल तळपदे

  • गीत-संगीत: साई पियुष

  • निर्माते: डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी

  • सूत्रधार: नितीन नाईक