
विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर देखील पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण गरम आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये तणाव आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी आरोप केला की, ‘भाजपच्या सशस्त्र गुंडांनी गुरुवारी पहाटे येथील पक्षाच्या कॅमॅक स्ट्रीट कार्यालयात घुसून तोडफोड केली’. अभिषेक बॅनर्जी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोन लिफ्टमधून सुमारे १४ लोक बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले आहेत. कथितरित्या झालेल्या तोडफोडीत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी यावेळी केला.
BJP’s “Good Governance”. Double Engine style.
Vandalism. Violence. Lawlessness.
Both my offices( Amtala and Camac street) have been vandalised and ransacked in the last one month.
The POLICE and BJP goons seem to fear NEITHER THE LAW NOR THE JUDICIARY.
This is no longer mere… pic.twitter.com/Q0adyMvkWV
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) September 3, 2026
बॅनर्जी यांनी दावा केला की, घुसखोरांनी कार्यालयाची नासधूस केली, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान केले आणि तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन पळवून नेले.
भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, त्यांचे बारानगरचे आमदार सजल घोष यांनी स्पष्ट केले की यात पक्षाचा एकही कार्यकर्ता सहभागी नव्हता.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आणि विचारले की पश्चिम बंगालचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय यावर कारवाई करणार की ‘नेहमीप्रमाणे डोळेझाक करत राहणार?’
बॅनर्जी यांनी न्यायव्यवस्थेला, विशेषतः कलकत्ता उच्च न्यायालयाला या घटनेची ‘गंभीर दखल’ घेण्याची आणि राज्यातील कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत बॅनर्जी यांनी सवाल केला की, ‘ते टीएमसीला आणि मला इतके का घाबरत आहेत की त्यांना अशा प्रकारच्या धमक्या आणि दहशतीचा मार्ग अवलंबावा लागत आहे?’
‘पश्चिम बंगालमध्ये जर विरोधकांशी हिंसाचार, तोडफोड आणि दहशतीच्या जोरावर असेच वागायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे’, असे बॅनर्जी म्हणाले.
या घटनेला ‘राजकीय गुंडगिरी’ म्हणत ते म्हणाले की, प्रत्येक हल्ल्याची आणि दहशतीची नोंद ठेवली जाईल आणि ‘काहीही विसरता येणार नाही’.
बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, टीएमसी कार्यकर्त्यांनी आणि वकिलांनी वारंवार फोन व ई-मेल करूनही कोलकाता पोलिसांनी जवळपास दोन तास कोणताही प्रतिसाद दिला नाही; तसेच या कथित हल्ल्याचे नियोजन, व्यवस्था आणि मार्गदर्शन कोणी केले याचा सखोल तपास करून संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीने आरोप केला आहे की, ही घटना पहाटे सुमारे ४:३० वाजता घडली, जेव्हा हत्यारे घेतलेल्या एका टोळक्याने कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड करण्यापूर्वी तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांनी दावा केला की, एक एअर प्युरिफायर, प्रिंटर, टेलिव्हिजन आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरून नेली गेली.
दरम्यान, भाजपच्या बारानगरच्या आमदाराने हे आरोप फेटाळून लावत म्हटले की, ‘मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की या घटनेत भाजपचा कोणीही सामील नाही’.






























































