रेल्वेच्या हद्दीत आठ महिन्यांत 310अपघाती मृत्यू; दोन्ही मार्गांवर मिळून मृत्यूचे 38 हॉटस्पॉट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कितीही जनजागृती केली तरी रेल्वेच्या हद्दीत अपघाताच्या घटना घडतच असतात. गेल्या आठ महिन्यांत दोन्ही रेल्वे मार्गांवर विविध अपघातांत ३१० जणांना प्राण गमवावे लागले असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. याची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी अपघातांचे ३८ हॉटस्पॉट आपल्या रडारवर आणले असून, अपघात रोखण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होतात. त्यामध्ये अनेकांचा जीव जातो, तर बरेच जण गंभीर जखमी होतात. केवळ स्थानकांमध्येच नाही, तर दोन स्थानकांच्या दरम्यान आणि स्थानकानजीक रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करू नका, असे वारंवार रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनधास्त रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. परिणामी, बऱ्याचदा लोकल किंवा एक्स्प्रेस आल्याचे समजत नाही आणि गाडीची धडक लागून अपघात घडतो. अशा प्रकारे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत रेल्वे हद्दीत ३१० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांपैकी २४२ मृत्यू मध्य रेल्वे मार्गावर, तर ६८ अपघाती मृत्यू पश्चिम रेल्वे मार्गावर झाले आहेत.

अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने रेल्वे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अपघातांचे ३८ हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. त्यांपैकी मध्य रेल्वे मार्गावर २७, तर पश्चिम रेल्वे मार्गावर ११ हॉटस्पॉट आहेत.

पोलिसांचे रेल्वे प्रशासनाला पत्र रेल्वे स्थानकांत असलेले अनधिकृत प्रवेशद्वार बंद करणे, जेथून रेल्वे रूळ ओलांडले जातात तेथे फेन्सिंग करणे, जेथे फेन्सिंगची उंची कमी आहे ती वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिज (FOB), सब-वे आणि आरओबीचे (ROB) बांधकाम करणे आणि दोन रेल्वे स्थानकांदरम्यान झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे, यांसारख्या आवश्यक उपाययोजना करण्याबाबत रेल्वे पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.