
मुंबईत हक्काचे घर मिळावे म्हणून आशेने डोळे लावून बसलेल्या गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला आता महामुंबईत (एमएमआर) देखील जागा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून बोरिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उलवे येथे जागेचा शोध सुरू केला असून त्याकरिता विकासकांकडून स्वारस्य निविदा मागवल्या होत्या. मात्र, म्हाडाच्या या निविदेला केवळ एकाच विकासकाकडून प्रतिसाद आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. दीड लाख गिरणी कामगारांपैकी आतापर्यंत केवळ १५ हजार कामगारांनाच घरे मिळाली आहेत; अजूनही लाखो गिरणी कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यासंदर्भात गेल्या महिन्यात स्वारस्य निविदा (ईओआय) जारी करण्यात आली होती. म्हाडाने जारी केलेल्या या निविदेला केवळ एकाच विकासकाकडून प्रतिसाद मिळाला आहे. चढ्ढा डेव्हलपर्सने वांगणी येथील आणखी एका जागेचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वांगणी येथील घरांच्या प्रकल्पाला आधीच गिरणी कामगारांचा विरोध आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांच्या उभारणीसाठी पुन्हा वांगणीतील जागेचा विचार होणे कठीण आहे.
अशी होती निविदेतील अट
प्रधानमंत्री आवास योजना किंवा अन्य घरकुल योजनेअंतर्गत ज्या विकासकाकडे बोरिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उलवे येथे कमीत कमी एक एकर जागा आहे, तसेच संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून लेआऊट व विविध परवानग्या मंजूर आहेत, अशा विकासकांकडून घरांच्या उभारणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारताना उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या, म्हणजेच प्रमुख रस्ते आणि रेल्वे स्टेशनलगतच्या जागांना प्राधान्य देण्यात येईल, असेही निविदेत म्हटले होते.




























































