
महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची कबुली खुद्द पालिका प्रशासनाने दिली.
८७ नव्या ‘एआय’आधारित अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सुमारे ३.४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आला. यावरील चर्चेत पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेची पोलखोल झाली. मुख्यालयात दररोज हजारो नागरिक आणि व्हीआयपींची ये-जा असते. कॅमेरे बंद असताना इतके दिवस प्रशासन काय करत होते, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी केला. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी सीसीटीव्हीचा डेटा किती दिवस साठवला जाईल, अशी विचारणा केली. भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी जुन्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत निविदेत तब्बल चारपट अधिक दर लावल्याचा आरोप केला. या चर्चेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी सुरक्षेसाठी हा प्रस्ताव मंजूर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. सर्व आक्षेप बाजूला ठेवत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
महागाईविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा-खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात ‘महागाई की मार नहीं चलेगी’ अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाज्या आणि धान्यांचे हार गळ्यात घालून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी महागाईवरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. भाज्या, धान्य, दूध, साखर यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. घरी जाऊन तुमच्या आई, बहीण किंवा पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.



























































